अधिवेशनाआधी होणार मंत्रिमंडळाचा विस्तार ! अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे संकेत
नागपूर - राज्यातील बहुप्रतिक्षित मंत्रिमंडळ विस्ताराला आता नागपुरात सुरू होणार्या पावसाळी अधिवेशनाच्या आधी मुहूर्त मिळण्याची शक्यता आहे. या संबंधी राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मंत्रिमंडळ विस्ताराबाबत संकेत दिले आहेत. अधिवेशनाआधी मंत्रिमंडळ विस्तार करण्याचा मानस असून, त्यासंदर्भात चर्चा सुरू असल्याचे सांगितले जात आहे. हिवाळी अधिवेशनाआधी होणारा मंत्रिमंडळ विस्तार लांबला होता. अखेर पावसाळी अधिवेशन आधी मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता असल्याने भाजप आणि सेनेमधील आमदारांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. या मंत्रिमंडळात कोणत्या नव्या चेहर्यांना संधी मिळेल आणि कोणाला डच्चू मिळेल, हे पाहण्यासारखे ठरणार आहे. गेले दीड वर्षे मंत्रिमंडळ विस्ताराबाबत केवळ चर्चाच सुरू आहे. अधिवेशनापूर्वी तर या चर्चेला उधाण येते. पुढील महिन्यात पावसाळी अधिवेशन सुरू होणार आहे. काही दिवसांपूर्वीच भाजपचे अध्यक्ष अमित शाह मुंबई दौर्यावर आले होते. तेव्हाही या विस्ताराबाबत चर्चा झाल्याचे समजते. त्यामुळे आता लवकरच हा विस्तार होण्याची शक्यता आहे.
