उघड्या गटारींमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात
शहराच्या उपनगरी भागात अनेक ठिकाणी सांडपाणी रस्त्यांच्या कडेने उघड्यावरच वाहत असल्याने दुर्गंधी बरोबरच डासांचा प्रादुर्भाव वाढल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याकडे मनपाचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.शहराच्या उपनगरी भागात अनेक ठिकाणी ड्रेनेजलाईन नाही, बंद पाईप, गटारी नाहीत त्यामुळे सांडपाणी रस्त्यावरच वाहत असते. महापालिकेच्या प्रभाग क्र. 5 मधील गांधीनगर परिसरात तर सुमारे 1 किमी पेक्षा लांब पर्यंत सांडपाणी रस्त्याच्या कडेनेच वाहत आहे. त्यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरली असून या उघडया गटारीत डासांची पैदास मोठ्या प्रमाणावर होवून परिसरातील नागरिकांना या डासांचा त्रास होत आहे. सायंकाळच्या वेळी तर नागरिकांना घरात बसणेही अवघड होत आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. उघड्यावर वाहणार्या या सांडपाण्याच्या प्रश्नावर उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांनी अनेकवेळा महापालिकेकडे केली. मात्रमहापालिकेने या प्रश्नाकडे दुर्लक्ष केले आहे.
