Breaking News

स्वतःला ओळखून निवडलेल्या क्षेत्रामध्ये उत्तम आणि प्रतिभासंपन्न व्हा - डॉ. अविनाश धर्माधिकारी

पुणे, दि. 18, जून - जीवनात कोणत्याही क्षेत्रात जाण्यासाठी केवळ कागदावरचे मार्क महत्वाचे नाहीत. टक्केवारीवर गुणवत्ता ठरवू नका. स्वतःमधील कलागुण ओळखा. उच्च गुण प्राप्त करणारा विद्यार्थी जीवनात यशस्वी होतोच असे नाही, यासाठी बुध्दिमत्ता आवश्यक आहे. आपली बुध्दिमत्ता कोणत्या क्षेत्रात चालते हे ओळखता आले, तर खर्‍या अर्थाने तुमच्या करियर वाटा मोकळ्या होतील. गुणवत्तेबरोबर बुध्दिमत्ता महत्वाची असल्याची अगदी ठोस भूमिका माजी सनदी अधिकारी डॉ. अविनाश धर्माधिकारी यांनी विद्यार्थ्यांसमोर मार्गदर्शन करताना रविवारी (दि. 17) मांडली.


जिजाई प्रतिष्ठानच्या वतीने पिंपळेगुरव येथील नटसम्राट निळू फुले नाट्यगृहात आयोजित कार्यक्रमात दहावी आणि बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना डॉ. अविनाश धर्माधिकारी यांनी करियरविषयी मार्गदर्शन केले.
करियरची सुरवात करू इच्छिणार्‍या दहावी व बारावीतील विद्यार्थ्यांना प्रा. डॉ. अविनाश धर्माधिकारी यांनी जीवनात यशस्वी होण्यासाठी करियरची त्रिसूत्री सांगितली. स्व:ची ओळख, करिअरची दिशा आणि त्या क्षेत्रात प्रतिभावंत होणे म्हणजेच यशस्वी होणे, असे त्यांनी सांगितले.
डॉ. धर्माधिकारी म्हणाले, इंजिनिअरिंग, मेडिकल, मॅनेजमेंट, सीए या अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांचा व त्यांच्या पालकांचा कल वाढला आहे. हे क्षेत्र करियरच्यादृष्टीने अतिशय महत्त्वाचे समजते जाते. मात्र विद्यार्थ्यांमध्ये या अभ्यासक्रमांसंदर्भात रूची नसेल, मित्रांच्या अथवा पालकांच्या दबावात विद्यार्थी या क्षेत्राची निवड करत असतील, तर त्या विद्यार्थ्याचे करियर धोक्यात राहिल. त्यामुळे विद्यार्थ्यांनी सर्वप्रथम आपली योग्यता, परिश्रम करण्याची तयारी, आवड हे लक्षात घेऊन करियरची निवड करावी, असा सल्ला त्यांनी दिला.
ते म्हणाले, विद्यार्थी व पालकांनी परीक्षेत गुण किती मिळाले यावर गुणवत्ता ठरवू नये. जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी गुण हे सर्वस्व नाहीत. पालकांनी आपल्या मुलांना करियर निवडण्याची आणि घडविण्याची मुभा द्यावी. त्याला जे क्षेत्र आवडते, त्या क्षेत्रामध्ये उत्तुंग कामगिरी करण्यासाठी प्रोत्साहित करावे. आपल्या इच्छा व आकांक्षा मुलांवर लादू नये. केवळ डॉक्टर आणि इंजिनिअर झाला म्हणजे जीवनामध्ये यशस्वी झाला असे नाही. त्यासाठी सर्वच गोष्टी विचारात घ्याव्या लागतात. प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये टॅलेंट असून, ते स्पर्धेतून सिद्ध केले पाहिजे. एखादे यश मिळाले म्हणून विद्यार्थ्यांनी भारावून जावू नये. यश मिळाल्यावर भारावून गेल्यास करियर संपले असे समजा. पुढच्या यशासाठी प्रयत्न केले पाहिजेत. आपण निवडलेल्या क्षेत्रात ज्यांना आयुष्यभर विद्यार्थी म्हणून राहायचे कळलेय, त्यांची वाटचाल अलौकिक बुद्धिमत्तेकडे चालू राहते, असे त्यांनी सांगितले.