पूरग्रस्तांनी केलेली अतिक्रमणे दंड घेऊन नियमित करण्याचा मार्ग मोकळा
पुणे - पानशेत पूरग्रस्तांना त्यांनी घरे नियमित करण्यास मदत व पुनर्वसन मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज तत्वत: मान्यता दिली. या निर्णयामुळे 3988 पूरग्रस्त गाळेधारकांना मोठा दिलासा मिळणार असून अनेक वर्षापासून प्रलंबित प्रश्न मार्गी लागणार आहे. पुरग्रस्तांची घरे मालकी हक्काची कठी रक्कम जमा करण्यास मुदत देण्याचा तसेच पूरग्रस्तांनी केलेली अतिक्रमणे दंड घेऊन नियमित करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यासंदर्भात आ. मेधा कुलकर्णी यांच्या विनंतीनुसार पाटील यांनी बैठक घेतली होती. त्यावेळी हे निर्णय घेण्यात आले. पानशेत पूरग्रस्तांना पुण्यामध्ये 3988 गाळे देण्यात आले होते. त्यातील अनेकांच्या नावावर हे गाळे झाले नव्हते. ते करण्यासाठी पूरग्रस्तांकडील पुरावे तसेच महसूल यंत्रणेकडील नोंदी तपासून हे गाळे मालकी हक्काने देण्यासाठी शासनाने ठरविलेली रक्कम जमा करण्यास पाटील यांनी मंजुरी दिली. 31 डिसेंबर 2018 पर्यंत पूरग्रस्तांना पैसे भरण्याची मुदत देण्यात आली आहे. तसेच पूरग्रस्तांनी त्यांना दिलेल्या जमिनी व गाळ्यांवर केलेली अतिक्रमणे, हस्तांतरितांनी केलेली व बाहेरील व्यक्तिंनी केलेली अतिक्रमणे राज्य शासनाने ठरविलेल्या दंडाची रक्कम भरून नियमित करण्यास यावेळी मान्यता देण्यात आली. या निर्णयामुळे 3988 पूरग्रस्त गाळेधारकांना दिलासा मिळणार आहे. तसेच पूरग्रस्तांच्या सहकारी संस्थांनाही या जमिनी मालकी हक्काने देण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला. यामुळे पूरग्रस्तांच्या 103 सोसायट्यांना फायदा होणार आहे.
