‘फॉरेस्ट’ वाहतूकदार संघटनेचा मोर्चा
।संगमनेर / प्रतिनिधी।
तालूका फॉरेस्ट वाहतूकदार संघटना, शेतकरी आणि शेतमजुरांनी आज {दि. १९} दुपारी दोन वाजता वन व गायरान जमीन अतिक्रमणधारक शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी येथील प्रांत कार्यालयावर भव्य मोर्चा काढला. यासंदर्भात नायब तहसीलदार मिलिन्द कुलथे यांना निवेदन देण्यात आले.
यात म्हटले आहे, की तालुक्यातील सुमारे ७८ गावे आणि वाड्यांवर वनजमीनधारक प्रत्यक्ष कसत आहेत. पिढ्यानपिढ्या वन व गायरान जमिनीवर सुमारे १ हजार ८३५ कुटुंबांचे अतिक्रमण आहे. आतापर्यंत यातील केवळ ७२५ अतिक्रमणधारक कुटुंबियांना जमिनी मिळाल्या आहेत. १ हजार ११० कुटुंबांना त्यांच्या जमिनीचा हक्क मिळालेला किंवा कायम करण्यात आलेला नाही. केंद्र शासनाच्या २००६ च्या आदेशानुसार २००५ पर्यंत वन व गायरान जमिनीवरील अतिक्रमित कुटुंबियांना जमिनीचा हक्क देण्यासंदर्भाचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र अद्यापपर्यंत या कायद्यानुसार उर्वरित वनजमीन हक्कांचा प्रस्ताव करण्यात आला नाही. पुढील एक महिन्याच्या आत तो केला जावा. प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन तलाठी, सर्कल व संघटनेचा एक पदाधिकारी यांच्या समोर पाहणी करावी.
यावेळी फॉरेस्ट वाहतूकदार सभेचे अध्यक्ष ज्ञानदेव सहाणे, अशोक डुबे, दशरथ हासे, भिका वाघ, सयाजी कानवडे, शांताराम वाळुंज आदींसह शेकडो वाहतूकदार शेतकरी उपस्थित होते.
अशा आहेत मागण्या
अतिक्रमित जमीन प्रत्यक्ष सर्वे करून मोजून मिळावी. जमिनीचा ७/१२ आणि पिकपाहणी लावावी. शासकीय योजनांची योग्य अंमलबजावणी व्हावी. वन जमीनधारक शेतकऱ्यांना शेती व त्या अनुषंगाने शासनाच्या सवलती मिळाव्यात. वन जमिनी वाहतूकदारांना पिवळे रेशनकार्ड द्या. जिल्हाधिकाऱ्यांनी नामंजूर केलेल्या प्रकारणांसंबंधीच्या नोटिसा मागे घ्या. पूर्वीची सर्व अपिल प्रकरणे कायम करावीत. ज्येष्ठ नागरिकांना दर महा पाच हजार रुपये पेन्शन मिळावी.
