शालेय साहित्याची मदत ही विद्यार्थ्यांना मौलिक भेट : काळे
कोपरगाव ता. प्रतिनिधी
जीवन जगत असतांना या समाजासाठी आपली काहीतरी जबाबदारी आहे, याची जाणीव प्रत्येकाला असली पाहिजे. समाजात अनेक गरजू व्यक्ति आहेत. त्यांना काही ना काही गोष्टींची उणीव जरूर भासत असते. अशा उणिवा ओळखून समाजातील गरजू विद्यार्थ्यांना कर्मवीर प्रतिष्ठानने सातत्याने मदत केली आहे. विद्यार्थ्यांची अडचण ओळखून त्यांना शालेय साहित्याची करण्यात आलेली मदत मौलिक भेट आहे, असे प्रतिपादन जिल्हा सहकारी बँकेच्या संचालिका चैताली काळे यांनी केले.
येथील कर्मवीर प्रतिष्ठानच्यावतीने गरजू विद्यार्थ्यांना चैताली काळे यांच्या हस्ते वह्यांचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी त्या बोलत होत्या. त्या म्हणाल्या, शिक्षण हा प्रत्येक विद्यार्थ्यांचा हक्क आहे. परंतु अनेक विद्यार्थ्यांकडे गुणवत्ता असूनही आर्थिक अडचणीमुळे हे विद्यार्थी आपले शिक्षण पूर्ण करू शकत नाही. अशा वेळी सामाजिक बांधिलकी जोपासत या विद्यार्थ्यांना शालेय साहित्याची केलेली मदत विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा आर्थिक भार कमी होण्यास नक्कीच मदत होणार आहे. अशा प्रकारचे सामाजिक उपक्रम सातत्याने राबवविले गेले पाहिजेत.
याप्रसंगी कोपरगाव तालुका जिनिंग-प्रेसिंगचे चेअरमन गोरक्षनाथ जामदार, व्हाईस चेअरमन सचिन आव्हाड, जनरल मॅनेजर काशिद, कर्मवीर प्रतिष्ठानचे राजेंद्र आभाळे, राजेंद्र बोरावके, नितीन बनसोडे, ऋषिकेश खैरनार, सचिन बढे, प्रसाद उदावंत, प्रदीप राय आदी उपस्थित होते.
