Breaking News

बिबट्याच्या हल्यात जखमी शेळी दगावली


आश्वी : प्रतिनिधी
संगमनेर तालुक्यातील उंबरी-बाळापूर येथे सोमवारी [दि. १८] रामनाथ मैड यांच्या वस्तीवर बिबट्याने केलेल्या हल्यात शेळी जखमी झाली होती. मात्र २४ तासांच्या आत त्या शेळीचा आज {दि. १९ } मृत्यू झाला. यामुळे मैड यांचे १० हजार रुपयांचे नुकसान झाले. याठिकाणी वनविभागाने पिंजरा लावून बिबट्या जेरबंद करावा, अशी मागणी येथील प्रगतशील शेतकरी भगवान मैड यांनी केली आहे. 

येथील रामनाथ मैड यांच्या गट नं १४१ मध्ये असलेल्या वस्तीवरील अंगणामध्ये बांधलेल्या शेळीवर सोमवारी दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास बिबट्याने हल्ला केला. विशेष म्हणजे यावेळी अवघ्या १० ते १५ फुटाच्या अंतरावर अंगणात मैड यांच्या तीन लहान नाती खेळत होत्या. सुदैवाने बिबट्याची वक्रदृष्टी या मुलीकडे गेली नाही. शेळीचा ओरडण्याचा आवाज आल्याने मैड यांच्या सूनबाई तेथे आल्या. त्यांनी मोठ्याने आरडा-ओरड करण्यास सुरवात केली. त्यामुळे बिबट्याला शेळी सोडून तेथून काढता पाय घ्यावा लागला. तीनही मुलींना पोटाशी धरत बिबट्या गेल्याची खात्री करण्यासाठी त्या पुढे गेल्या. त्यावेळी दोन त्यांना बिबटे दिसल्याचे त्यांनी सांगितले. बिबट्याच्या या हल्ल्यात शेळीच्या गळ्याभोवती खोलवर जखमा झाल्या होत्या. त्यामुळे या शेळीचा अखेर २४ तासाच्या आत आज सकाळी मृत्यू झाला. 

दरम्यान, या परिसरात वनविभागाने पिजंरे लावून हे बिबटे जेरबंद करावेत आणि मैड कुटुंबाला आर्थिक नुकसान भरपाई द्यावी, अशा मागण्या शेतकरी भगवान मैड, रामनाथ मैड, गणेश मैड, राजेंद्र भुसाळ, सुरेश खेमनर, सामाजिक कार्यकर्ते अशोक भुसाळ आदींसह ग्रामस्थांनी केली आहे.