शेतकर्यांच्या रोष सरकारचे उच्चाटन करील ः राजेंद्र नागवडे
श्रीगोंदा : शेतीमालाला उत्पादन खर्चावर आधारीत हमीभाव मिळावा व दूध खरेदी दरात वाढ करण्याची शेतकर्यांची मागणी रास्त आहे. सरकारला शेतकर्यांचे कष्ट, वेदना व समस्यांची जाणीव आहे. हे सरकार शेतकर्यांची चेष्टा करीत आहे, मात्र अन्नदात्या शेतकर्याचा कोप या सरकारची गच्छंती करु शकतो. सरकारने शेतकर्यांचा अंत न पाहता त्यांच्या मागण्या तात्काळ मंजूर कराव्यात अशी मागणी ’नागवडे’ कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी केली आहे.
सरकारने दूध खरेदी दरात वाढ करावी, शेतीमालाला उत्पादन खर्चावर आधारित हमीभाव द्यावा, तसेच ठरलेल्या हमीभावानुसारच शेतमालाची खरेदी करावी, या मागण्यांसाठी शनिवारी (दि.2) सकाळी राजेंद्र नागवडे यांच्या नेतृत्वाखाली ढोकराई चौकामध्ये रस्त्यावर दूध ओतून आंदोलन करण्यात आले. यावेळी बोलताना ते म्हणाले की, आश्वासने देण्यात माहीर पण कृतीशून्य व असंवेदनशील सरकार केंद्रात व राज्यात सत्तेत असल्याने शेतकर्यांच्या समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहेत. दूध खरेदी दरात वाढ करण्याचा सरकारचा निर्णय केवळ ’अच्छे दिन’ सारखीच सोलकढी थाप आहे. भाजीपाला व अन्य शेतीमालाचे भाव दिवसागणिक कमी होत आहेत. मात्र ’अच्छे दिन’चे स्वप्न दाखविणार्यांना शेतकर्यांच्या प्रश्नांशी देणेघेणे नाही, ते उद्योगपतींना रेड कार्पेट टाकण्यात मग्न आहेत. शेतकरी हा अन्नदाता, जगाचा पोशिंदा आहे त्याच्या समस्या व मागण्यांची सरकारने दखल न घेतल्यास या सरकारला सत्तेवर आणणारा हाच शेतकरी या सरकारला पायउतार करु शकतो, याचे भान सत्ताबेभान सरकारने ठेवण्याची गरज आहे. शेतकरी सहनशील आहे म्हणून त्याच्या सहनशीलतेचा अंत पाहण्याचा प्रयत्न सरकारने थांबवावा व दूधासह अन्य शेतीमाल व भाजीपाल्याचे दरात वाढ करुन शेतकर्यांना दिलासा द्यावा असे आवाहन नागवडे यांनी केले.
यावेळी ’नागवडे’ कारखान्याचे उपाध्यक्ष केशव मगर, तालुका दूध संघाचे अध्यक्ष सोपान थिटे, उपाध्यक्ष सुरेश घोलप, कारखान्याचे संचालक सुभाष शिंदे, दूध संघाचे संचालक किसन नलगे, दिलीप वागसकर, प्रकाश पाटील, ज्ञानेश्वर पाचपुते, महेश जंगले आदिंसह दूध उत्पादक व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. रस्त्यावर दूध ओतण्याचे आंदोलनावेळी मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित असल्याने, नगर-दौंड रस्त्यावरील वाहतुक काही काळ विस्कळीत झाली, परिणामी या आंदोलनावेळी अघोषित रास्ता रोको आंदोलन झाले.
