Breaking News

शासकीय कार्यालयावर अभिनंदन फ्लेक्सबाजी;प्रशासनाचा कानाडोळा


कर्जत : ग्रामसेवकाच्या पदाधिकारीपदी निवड झाल्याबद्दल चक्क कर्जत पंचायत समिती कार्यालयावर अभिनंदन फ्लेक्स लावण्यात आल्याने, सरकारी कार्यालय जनतेच्या कामासाठी आहे की, अभिनंदन फ्लेक्स लावण्यासाठी आहे? याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. प्रशासनही या महत्वाच्या बाबीकड़े कानाडोळा करत असल्याची प्रतिक्रिया कर्जत पंचायत समितीचे उपसभापती प्रशांत बुद्धिवंत यांनी दिली आहे.

शासन जनतेच्या शासकीय कामासाठी एकाच दालनात सर्व कामे तात्काळ व्हावी यासाठी करोडो रुपयांची इमारत उभी करत आहे. मात्र त्याच शासकीय इमारतीवर जनतेच्या हिताची कोणतीही माहिती कार्यालय प्रसिद्ध करत नाही. मात्र आपल्या कर्मचार्‍याची अथवा अधिकार्‍याची संघटनेवर निवड झाल्यास, त्याचा अभिनदन फ्लेक्स मात्र मोठ्या तत्परतेने सर्वांचे लक्ष वेधेल अशा ठिकाणी लावण्यात येतो. कर्जत तालुक्यातील एका ग्रामसेवकाची संघटनेच्या पदाधिकारीपदी निवड झाली, त्याचा अभिनंदनाचा फ्लेक्स कर्जत पंचायत समितीच्या कार्यालयावर मोठ्या दिमाखात लावण्यात आला. सदरचा फ्लेक्स अचारसहिंता काळात लावण्यात आला असल्याचा आरोप शिवसेना नेते तथा कर्जत पंचायत समितीचे उपसभापती प्रशांत बुद्धिवंत यांनी केला आहे. यासह त्यांनी पंचायत समितीतील गटविकास अधिकार्‍यांसह सर्व विभागातील प्रमुख अधिकारी शुक्रवारी कार्यालयीन वेळेत पार्टीला गेले असल्याचेही निदर्शनास आणून दिले. या बाबीकड़े जिल्हा प्रशासन लक्ष देणार की, नाही? असा सवाल बुद्धिवंत यांनी उपस्थित केला आहे.