Breaking News

काकड आरतीमुळे भक्तिमय वातावरण


कोपरगाव शहर प्रतिनिधी 

येथील सराफबाजारातील मराठा पंचमंडळाच्या दक्षिणमुखी हनुमान मंदीर आणि श्री गोपालकृष्ण मुरलीधर मंदिरामध्ये अधिकमासानिमित्त दररोज सकाळी काकड आरतीच्या चाललेल्या गजरामुळे भक्तीमय वातावरण निर्माण झाले आहे. कोपरगावामध्ये ठिकठिकाणी काकडयाचे आयोजन करण्यात आलेले आहे. 

शहरातील गांधीनगर, लक्ष्मीनगरातील मारुती मंदीर, सराफ बाजारातील दक्षिणमुखी हनुमान मंदीर, श्री मुरलीधर मंदीर, संत नरहरी मंदीर त्याचप्रमाणे नदीकाठचा दत्ताचा पार याठिकाणी विशेष करुन विविध भजनी मंडळांनी स्वयंस्फुर्तीने काकडा सुरु केल्याचे दिसून येते. मराठा पंचमंडळाचे दक्षिणमुखी हनुमान मंदीर अनेक भाविकांचे श्रध्दास्थान आहे. गावच्या वेशीमध्ये असल्यामुळे पुरातन काळापासून या मंदीराला मोठे महत्व प्राप्त झालेले आहे. या ठिकाणी कोपरगावातील चंद्रकांत कानडे (विणेकरी), तुळशीदास बागुल, अशोक रुईकर, दत्तोबा ठोंबरे, कृष्णा तिरसे, रमेश पाठक,सोपानराव डुबे, अशोक वडनेरे, अनिल भावसार, मनमोहन गुजराथी, तुकाराम मोरे आदी मंडळी हौसेने दरवर्षी एकत्र येतात. काकडा भरवितात. काकडा सुरु असेपर्यंत मंदीरामधील विठठल रखुमाई, नामदेवाच्या मुर्तीची विधीवत पुजा माहेश्वरी समाजातील सोमनाथ डागा हे करीत आहेत. प्रत्यक्ष काकड आरती सुरु झाल्यानंतर हातात काकडा घेवून विठठल रखुमाईची पूजा होत असतांना, टाळ, विणा आणि देवळातील घंटानादाच्या गजरामध्ये आलेले सर्व भाविक तल्लीन होऊन जातात.