Breaking News

सरपंच पदावरून पायउतार; जिल्हाधिकार्‍यांचा निर्णय तालुक्यात खळबळ

राहुरी  तालुक्यात अग्रगण्य असलेल्या शिलेगाव ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाबाबत जिल्हाधिकारी यांनी धक्कादायक निकाल देत सरपंच पांडूरंग म्हसे यांचे पद रद्द करण्याचे आदेश दिल्याने, तालुक्यात मोठी खळबळ उडाली.
 
शिलेगाव ग्रामपंचायतीची निवडणूक 28 फेब्रुवारी रोजी झाली होती. सदरच्या निवडणुकीत पांडूरंग म्हसे यांच्याकडून रमेश म्हसे यांचा सरपंचपदाच्या लढतीत पराभव झाला होता. निवडणुकीत पांडूरंग म्हसे यांच्या मंडळाचे 5 तर रमेश म्हसे यांच्या मंडळाचे 4 सदस्य निवडून आले होते. मात्र, निवडणुकीनंतर रमेश म्हसे यांनी पांडूरंग म्हसे यांना तीन अपत्य असल्याबाबतचे पुरावे जिल्हाधिकारी कार्यालयात सादर करून त्यांचे पद रद्द करण्याची मागणी केली होती. रमेश म्हसे यांच्याकडून अ‍ॅड. गोरक्षनाथ पालवे यांनी जिल्हाधिकारी यांच्यापुढे पुरावे सादर करून सविस्तर माहिती मांडली. जिल्हाधिकारी कार्यालयात दोन्ही पक्षाकडून वाद प्रतिवाद झाल्यानंतर 25 मे रोजी अंतिम निर्णय देण्यात आला. सुनावणीमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयातून सरपंच पांडूरंग म्हसे यांचे पद रद्द करण्याचे आदेश दिले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातून प्राप्त झालेल्या आदेशाची प्रत अर्जदार रमेश म्हसे, शिलेगाव ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक व सर्व सदस्यांना देत सरपंचपद रद्द झाल्याचे सूचित करण्यात आले.