Breaking News

गरजू शेतकर्‍यांना कर्ज मिळालेच पाहिजे - सुप्रिया सुळे

पुणे, दि. 20, जून - गरजू शेतकर्‍यांना कर्ज मिळालीच पाहिजेत. त्यासाठी आवश्यक ती पावले उचलायलाच हवीत.सर्व्हरमधील समस्येमुळे जिल्ह्यातील शेतकर्‍यांना सातबारे उतारे मिळण्यास अडचणी येत आहेत. त्यामुळे कर्जवाटप प्रक्रियेस उशीर होतो. यावर तातडीने तोडगा काढण्यात यावा, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे केली आहे. विविध प्रश्‍नांबाबत खासदार सुळे यांनी जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांची भेट घेतली. बारामतीसह दौंड, इंदापूर, पुरंदर तालुक्यातील नागरी समस्या, सिंहगडावरील स्टॉलधारकांच्या समस्या तसेच पुण्यातील रिंगरोडबाबत स्थानिक शेतकर्‍यांच्या हरकतीबाबत या बैठकीत चर्चा झाली. 
सर्व्हरमध्ये बिघाड झाल्याने सातबारा मिळत नाहीत, अशी कारणे तलाठ्यांकडून देण्यात येत आहेत. अशी तांत्रिक अडचण असेल, आणि पुढील पंधरा दिवसांत यावर तोडगा निघाला नाही, तर तलाठ्यांनी हस्तलिखित सातबारे उतारे द्यावेत. त्यामुळे कर्जप्रकरणे अडकून राहणार नाही, अशी सूचना थोरात यांनी यावेळी केली. यावर 15 दिवसांत योग्य तो निर्णय घेऊ, असे आश्‍वासन जिल्हाधिकारी राम यांनी दिले.