हार-प्रसादात २ हजारांची फसवणूक गुन्हा दाखल ; एकाला अटक
शिर्डी / प्रतिनिधी
शिर्डीत हार प्रसादाचे दरपत्रक ठरविले जाईल, अशी घोषणा करून १५ दिवस झाले. तरी अंमलबजावणी नेमकी
होणार तरी कधी, याची उत्सुकता आहे. शिर्डीत येणाऱ्या साईभक्तांना सतत फसविले जात असताना परत एकदा हैद्राबाद येथून शिर्डीत साईदर्शनासाठी आलेल्या एका व्ही. आय. पी. भक्ताला हार प्रसाद ताट देऊन फसवणूक करण्याचा प्रकार घडला. या प्रकरणी साईभक्त अनघा वसंत भरगोदे {वय
६५ } या महिलेने शिर्डी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
येथील विकास सुरेश पगारे {वय २४ रा. पिंपळवाडी ता. राहाता}, दुकान मालक आरणे {पूर्ण नाव माहिती नाही} यांनी ही फसवणूक केली आहे. सदर महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार या दोघांविरुद्ध भा. दं. वि. ४२०, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.
आज {दि २३} सकाळी ११ वाजेच्या सुमारास शिर्डीत नंदा दीप फुल भांडार नगर-मनमाड रोड येथील एका नामांकित राजकीय पदाधिकाऱ्याला हॉटेलच्या समोर आरोपीने २ हजार रु. चे व्ही. आय. पी. हार प्रसादाचे ताट आहे, थेट दर्शन घडेल, उदी हार प्रसाद मिळेल, कमी वेळेत दर्शन होईल, असे सांगून फसवणूक केली. खोटे बोलून २ हजार रु. ताटापोटी घेतले, असे तक्रारीत म्हटले आहे. या फसवणुकीचा तपास पो. नि. अरविंद माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी साळवे हे करीत आहेत.
शिर्डीत हार प्रसादाच्या नावाखाली काही तरुण मोठ्या प्रमाणावर फसवणूक करतात. त्याचा परिणाम शिर्डीत येणाऱ्या भक्तावर होत आहे. यापूर्वीही फसवणुकीचे पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. मात्र म्हणावे त्या प्रमाणात घट होताना दिसून येत नाही. कायद्याचा धाक वाटत नसल्याने भक्ताचे शोषण कठोर कारवाई झाली तर या प्रकाराला आळा बसेल, असा सूर साईभक्तांमधून व्यक्त होत आहे.