Breaking News

शिंगणापूरचे विश्वस्त मंडळ बरखास्त केंव्हा होणार? कोण होणार देवस्थानचा नवा अध्यक्ष?



सोनई प्रतिनिधी 

शनिशिंगणापूर देवस्थान ट्रस्ट ताब्यात घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्याने विश्वस्त, अधिकारी आणि कामगारांमध्ये कमालीची अस्वस्थता पसरली आहे. राज्य सरकार सध्याचे विश्वस्त मंडळ केंव्हा बरखास्त करणार, नवीन विश्वस्त मंडळात कोणाकोणाची वर्णी लागणार, कोण अध्यक्ष होणार, याविषयी शिंगणापुरात सध्या उलटसुलट चर्चेला मोठे उधाण आले आहे. 

प्रसिद्ध गायिका अनुराधा पौडवाल यांच्या भजन कार्यक्रमातून आणि गुलशन कुमार यांच्या १९९५ मधील 'सूर्यपूत्र शनिदेव' या सिनेमाने शनिशिंगणापूर देवस्थान जगभरात प्रसिद्ध झाले. त्यात स्व. बाबुराव बानकर यांची निस्वार्थी शनिसेवा पाहून या गावातील शनिभक्तांनी त्यांच्या कारभारावर विश्वास ठेवून या कार्यात भरीव योगदान दिले. त्यामुळे शनिभक्तांसाठी येथे अनेक प्रकरच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. 

मात्र यामध्ये राजकीय हस्तक्षेप होत असल्याने सन २००५ पासून ग्रामस्थ आणि देवस्थान विश्वस्त यांच्यात संघर्ष वाढू लागला. यात अनेक तक्रारी आरोप प्रत्यारोप झाले. 

देवस्थानच्या भ्रष्ट कारभारावर जोरदार टीका झाली.

चौकट 

चौकशी झाली तर आपले काय? 

२००५ पासून कार्यालयीन खरेदी, कर्मचारी भरती, भोजनालय माल खरेदी, बर्फी, गाळे, तेल, पानसनाला सुशोभिकरण, साहित्य खरेदी आदी अनेक प्रकारच्या निविदांची शासनस्तरावरून चौकशी होणार असल्याचे बोलले जात आहे. असे झाल्यास जबाबदारी निश्चित धरून विश्वस्त, अधिकारी आणि कामगार आदींची चौकशी होणार आहे. त्यामुळे या सर्वच संबंधितांना या समस्यांनी हैराण केले आहे.