Breaking News

चंद्रपूर,गडचिरोली, यवतमाळ जिल्ह्यातील रस्ते विकास कामांचा मार्ग मोकळा


नवी दिल्ली  : राज्यातील चंद्रपूर,गडचिरोली व यवतमाळ या नक्षलग्रस्त व शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांतील महामार्गांसह ६ हजार कोटींच्या रस्ते विकास कामांना उच्चस्तरीय बैठकीत मंजुरी देण्यात आली असून या कामांना गती येणार असल्याची माहिती केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी दिली.


केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व महामार्गमंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली आज परिवहन भवन येथे केंद्रीय गृह राज्यमंत्री तथा चंद्रपूरचे खासदार हंसराज अहीर, महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री तथा यवतमाळचे पालकमंत्री मदन येरावार, गडचिरोलीचे खासदार अशोक नेते तसेच केंद्र व राज्य शासनाचे वरिष्ठ अधिकारी यांच्या उपस्थितीत चंद्रपूर,गडचिरोली आणि यवतमाळ जिल्ह्यातील रस्ते विकास कामांची आढावा बैठक झाली.


या बैठकीत तिन्ही जिल्ह्यांतील ‘भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणांतर्गत’ बांधण्यात येणारे ८ महामार्ग, ‘अभियांत्रिकी, खरेदी व बांधकाम(ईपीसी) कार्यक्रमांतर्गत’ बांधण्यात येणारे ९ रस्ते आणि ‘केंद्रीय रस्ते निधीतून’करण्यात येणाऱ्या २२ कामांचा आढावा घेण्यात आला. यावेळी रस्ते विकास कामांसंदर्भातील मंजुऱ्या देण्यात आल्या. तसेच, या कामांसाठी आवश्यक असणारी वन विभागाची मंजुरी व रस्ते बांधकामांचे सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याचे निर्देशही देण्यात आल्याचे श्री. अहीर यांनी यावेळी सांगितले.