Breaking News

दुधाला हमीभाव तर ग्राहकांना भेसळमुक्त दुध मिळण्याची मागणी

अहमदनगर (प्रतिनिधी)- पश्‍चिम महाराष्ट्रात दुधाचा प्रश्‍न अतिशय गंभीर झाला आहे. दुधाचे दर कोसळल्याने भाकड गाय आणि म्हतारे बैल सांभाळणे शेतकर्‍यांना अवघड झाले आहे. त्याचबरोबर शहरी ग्राहकांना शुद्ध दूध मिळत नसून, भेसळीच्या दूधाने ग्राहकांना कॅन्सरसारख्या दुर्धर रोगांना सामोरे जावे लागत आहे. या पार्श्‍वभूमीवर प्रहार संघटनेच्या वतीने तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वारात भाकड गाय बांधून आंदोलन करण्यात आले.
आमदार बच्चू कडू यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यभर तहसील कार्यालयावर प्रहार संघटनेच्या वतीने सदर प्रश्‍नी आंदोलन करण्यात आले. अहमदनगर तहसिल कार्यालया समोर झालेल्या आंदोलनात प्रहार शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अजय महाराज बारस्कर, जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.लक्ष्मणराव पोकळे, कार्याध्यक्ष विनोदसिंग परदेशी, भाऊसाहेब मोढवे, विजय मस्के, बाबासाहेब महापुरे, बाहुबली वायकर, संतोष जाधव, किशोर सुर्यवंशी, संजय पुंड, संतोष जाधव, प्रकाश बेरड, डॉ.प्रमोद आळकुटे, संदीप नवगिरे, इंद्रपाल सिंह, सोमनाथ पवार, अजय सोलंकी, दत्ता झरेकर आदिंसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते.

अजय महाराज बारस्कर म्हणाले की, मागील वर्षी याच दिवशी एक जूनला शेतकरी संप सुरू झाला होता. सरकारने कर्जमाफीच्या नावाखाली पद्धतशीरपणे शेतकर्‍यांचे आंदोलन दडपले. शेतकर्‍यांना पुर्णत: कर्जमाफी सुद्धा मिळाली नाही. शेती व्यवसाय पूर्णपणे धोक्यात आलेला आहे. त्यामुळे शेतकर्‍यांमध्ये मोठा असंतोष निर्माण झाला आहे. दूध व्यवसाय जर मोडला तर शेतकरी पूर्णपणे देशोधडीला लागेल व सरसकट शेतकर्‍यांच्या आत्महत्या होतील. त्याचबरोबर शहरांमध्ये ग्राहकांना उत्तम प्रतीचे शुद्ध दूध मिळत नाही. दूध डेर्‍या मालक प्रचंड प्रमाणात दुधाची भेसळ करून भेसळयुक्त दूध विकत आहे. लहान मुलांना भेसळयुक्त दुधाने कॅन्सर सारखे भयानक आजार जडत आहेत. अन्न व भेसळ प्रतिबंधक विभाग यांचे जिल्हा पातळीवरील अधिकारी कर्मचारी डेअरी मालकांशी संगनमत करून दुधात भेसळ करणार्‍यांवर कारवाई करीत नाही. त्यामुळे शेतकरी आणि ग्राहक दोन्हीं अडचणीत आले आहेत. शासनाचे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच यावेळी जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.लक्ष्मणराव पोकळे, कार्याध्यक्ष विनोदसिंग परदेशी, महिलाध्यक्षा संगीता शर्मा आदींची भाषणे झाली.
दूध डेअरी मालकांना सरकारने अनुदान न देता शेतकर्‍यांच्या प्रत्येक गाय, म्हशीवर पाच हजार रुपये महिना अनुदान द्यावे. भाकड जनावरे सांभाळण्यासाठी ज्याप्रमाणे गो रक्षण संस्थेला अनुदान दिले जाते त्याप्रमाणे प्रत्येक शेतकर्‍यांना प्रति जनावर अनुदान मिळावे. शहरी ग्राहकांना भेसळयुक्त दूध मिळत असताना एफडीए अन्न भेसळ मार्फत छापे मारून त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन तहसिलदार यांना देण्यात आले.