घडल्या प्रकारास पालकमंत्रीच जबाबदार : डॉ. भिसे
जामखेड / ता. प्रतिनिधी
तालुक्यातील चोंडी येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीच्या निमित्त कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. या कार्यक्रमात गोंधळ घातल्याचा आरोप करीत इंद्रकुमार भिसे, अप्पासाहेब मासाळ यांच्यासह अनेक तरुणांना पकडण्यात आलं. या सर्वांवर खोटे गुन्हे दाखल केले, असा आरोप करतानाच भिसे आणि मासाळ यांनी घडल्या प्रकारास राम शिंदे हेच जबाबदार असल्याचं सांगितले.
शिवसेना उपनेते अनिल राठोड यांनी तुरुंगातील आंदोलनकर्त्यांची भेट घेवून त्यांच्या भावना जाणून घेतल्या. यावेळी बोलताना भिसे यांनी आरोप केला की, जयंती कार्यक्रमात गोंधळ होणार आयोजकांना माहिती होते. त्यामुळे तीनजणांना जिल्हाबंदीची नोटीस बजावण्यात आली होती. तरीही एवढे लोक जयंती कार्यक्रमात आले कसे? कार्यक्रमात गोंधळ व्हावा, ही पालकमंत्री शिंदे यांचीच इच्छा होती. आम्ही तीन वर्षांपासून धनगर आरक्षणाची मागणी करीत असल्यामुळेच पालकमंत्री शिंदे यांनी कटकारस्थान करून आम्हाला अडकवले आहे. आमच्यावरील खोटे गुन्हे मागे घ्यावेत व जयंती आयोजक म्हणून पालकमंत्री शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. तुरुंगातून सुटल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन आमच्या भावना त्यांच्या कानावर घालणार असल्याचेही भिसे यांनी यावेळी सांगितले.
या भेटीनंतर अनिल राठोड म्हणाले की, आरक्षण मागणे किंवा सोलापूर विद्यापीठाला अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्याची मागणी करणे हा गुन्हा नाही. गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये विद्यार्थी, शिक्षक, डॉक्टर, वकिलांसह इतर समाजांतील तरुणांचाही समावेश आहे.
डॉ. इंद्रकुमार भिसे व आप्पासाहेब मासाळ यांनी राठोड यांच्याशी बोलताना सांगितले की, धनगर समाजातील तरूणांबरोबर मराठा समाजातील तरूण कार्यकर्ते आहेत, अनेक विद्यार्थी आहेत कार्यकर्त्यांवर धरपकड करून गुन्हे दाखल केले आहेत. अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती कार्यक्रमात लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन येणार म्हटल्यावर कडक सुरक्षा व्यवस्था हवी होती, सगळीकडे सीसीटीव्ही कॅमेरे हवे होते. श्वान पथकासह सर्व यंत्रणा सज्ज हवी होती. परंतु कसलीच यंत्रणा नव्हती. कार्यक्रमात गोंधळ झाला म्हणून आयोजक म्हणजेच पालकमंत्री राम शिंदे यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची गरज आहे.
