Breaking News

निळवंडे कालव्यांचा प्रश्‍न सोडविण्यासाठी प्रयत्नशील : ना. शिवतारे

निळवंडे धरणाचे कॅनॉलबाबत प्रथमपासून तातडीने कालवे व्हावे, यासाठी प्रयत्न सुरु आहेत. मात्र उत्तरेतील काही राजकीय नेत्यांच्या खोडसाळपणामुळेच या कालव्यांचा प्रश्‍न प्रलंबित राहिला असून, तो मार्गी लावण्यासाठी मुख्यमंत्र्याबरोबर विधानसभेत तीन तास या विषयावर चर्चा केली असल्याचे जलसंपदा मंत्री ना. विजय शिवतारे यांनी सांगितले. 

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस विश्‍वासराव आरोटे यांनी नुकतीच त्यांची भेट घेतली, यावेळी ते बोलत होते.
निळवंडे धरणाचे काम पूर्ण झाले. या धरणातून पाच वर्षांपासून आवर्तने सुटतात, मात्र धरणाअगोदर काही भागात कालव्यांची कामे झाली, त्यामध्ये मोठ्या प्रमाणात शेती या कालव्यांसाठी संपादीत करण्यात आली. उत्तरेतील काही नेत्यांचा कालव्यांना विरोध होतो तर, काही नेत्यांना कालवे नको आहेत. निवडणूका जवळ आल्यानंतर निळवंडेच्या कॅनॉलबाबत त्या भागातील नेते निवडणूकीचा मुद्दा बनवत जनतेची फसवणूक करत असल्याचे त्यांनी सांगितले.
निळवंडेचे कॅनॉल ज्या भागातून गेले, त्या भागातील लोकांना पाण्याची अत्यंत गरज आहे. मात्र कॅनॉलद्वारे पाणी गेल्यानंंतर प्रवरा पात्रातून आवर्तने येणार नाहीत. त्यामुळे कॅनॉलबाबत बंदीस्त कॅनॉल व खुले कॅनॉल याबाबत जनतेमध्ये संभ्रम निर्माण करण्यात उत्तरेतील नेते आघाडीवर आहेत. हा प्रश्‍न चार वर्षात मी स्वत: निळवंडे धरणावर जाऊन अकोले, संगमनेर, राहता, कोपरगाव येथील कॅनॉल भागात पाहणी केली व तेथील शेतकर्यांनी देखील या कालव्यांबाबत आपणास माहिती दिली आहे. येत्या काही दिवसातच या कॅनॉलचा प्रश्‍न मिटणार आहे. यासाठी केंद्र सरकारने देखील कालव्यांना निधी दिला. राज्यातील जलसंपदा विभागांतर्गत असलेले सर्व प्रकल्प आमच्या सरकारने तातडीने मार्गी लावले. मात्र 9 टीएमसी निळवंडे धरणातून जी आवर्तने सोडली जाणार ती, कॅनॉलद्वारेच सोडण्यात येतील. कोणी कितीही राजकीय वजन वापरले तरी कालव्यांचा प्रश्‍न बंद होणार नाही. जलसंपदा विभागाने निळवंडे बाबत सर्व माहिती आमच्या कार्यालयाकडे सादर केली असून, त्याबाबत आमच्या कार्यालयाने देखील निळवंडे निर्मितीच्या वेळेस जो प्लॅन तयार केला, त्या प्लॅननुसारच कालव्यांची कामे होतील, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. यावेळी सिन्नरचे आ. राजाभाऊ वाजे, आ. बाळासाहेब मुरकुटे, शिवसेना जिल्हा प्रमुख रावसाहेब खेवरे, पालघर जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष कुंदन पाटील, रविंद्र गजे आदी उपस्थित होते.