खासदारकीच्या कार्यकाळातच ‘निळवंडे’ला चालना : माजी खा. वाकचौरे
।तळेगांव दिघे/ प्रतिनिधी।
खासदारकीच्या कार्यकाळात २०१४ पर्यंत निळवंडे धरण व्हावे, यासाठी या प्रकल्पाला १४ मान्यता मिळवून शेवटच्या टप्प्यात मान्यतेसाठी हे आणून ठेवले. यात श्रेयाचे राजकारण न करता हे केवळ भाजप सरकारमुळेच झाले आहे, असे सांगत यासंदर्भात केलेला पत्रव्यवहार माजी खा. भाऊसाहेब वाकचौरे यांनी सोमवारी {दि. २५ } तळेगांव येथे पत्रकार परिषदेत दाखविवला.
ते म्हणाले, गेल्या अनेक दिवसांपासून निळवंडे धरणाविषयीचा व कालव्यांचा परिपाठ सुरू आहे. तळेगांव हे निळवंडे धरणाचे पाणी मिळावे, यासाठी आक्रमक आहे. त्यासाठी आंदोलने व रस्तारोको करण्यात आला. निळवंडे पाटपाणी कृती समितीने अनेकदा या विषयीच्या चर्चेला वेग दिला. पाटपाणी कृती समितीने केलेल्या पाठपुराव्याचाही उल्लेख करीत या प्रकल्पला मान्यता मिळविण्यासाठी या समितीने सतत पाठपुरावा केला. केंद्रिय जल आयोगाची मान्यता आल्यानंतर श्रेयवादाची लढाई सुरू झाली. मात्र याचे मुख्य श्रेय भाजपा सरकार व पाटपाणी कृती समितीला आहे.
यावेळी नानासाहेब जवरे, किसन चत्तर, नानासाहेब गाढवे, रूपेंद्र काले, भीमराज चत्तर, गंगाधर रहाणे, रमेश दिघे, मच्छिंद्र दिघे, तुषार काटकर, पुंजाहरी दिघे, संजय गमे, चांगदेव घोरपडे, नामदेव दिघे उपस्थित होते.
