Breaking News

नेवासा शहरात स्वच्छतेचा उडाला बोजवारा

मकरंद देशपांडे , नेवासा - नेवासा शहरासाठी नगर पंचायत स्थापन होवुन एक वर्ष झाले असुन पुर्वी सहा प्रभाग होते . आता सतरा प्रभाग झाले आहेत .या सर्व प्रभागमध्ये गटारी स्वच्छ करणे, त्यातील घाण उचलणे , घरामधील कचरा संकलन करणे, डास निर्मुलनच्या उपाय योजना करणे , सर्व प्रमुख रस्त्याची साफसफाई करणे आदी स्वच्छतेच्या कामामध्ये दिरंगाई होत असल्याने शहराचा स्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर आला असून शहरात स्वच्छतेचा बोजवारा उडाला आहे.

नगर पंचायत होण्याआधी आठवड्यातून दोनदा येणाऱी घंटागाडी आता बारा पंधरा दिवसांनी येते . त्यामुळे नागरिक तो रस्त्यावर, गटारी मध्ये, गल्लीतील मोकळ्या जागेत टाकत आहेत. रस्त्याची साफसफाई वेळेत होत नाही गटारींमधील गाळ काढल्यावर तो लवकर उचलला जात नाही . त्यामुळे तो पुन्हा गटारीत जातो स्वच्छतेची ही समस्या केवळ नियोजनाचा अभाव असल्याने झाली आहे.
सफाईच्या नियोजनामध्ये काही नगरसेवक व समाजीक कार्यकर्ते हस्तक्षेप करतात. त्यामुळे ही नियोजन होत नाही. शहरातील काही प्रभागमध्ये भुमिगत गटारीचे काम झाले आहे तर काही अपुर्ण आहे . या भुमिगत गटारीचे काम चांगले झाल्यास सांडपाण्या प्रश्न सुटणार आहे . या कामाच्या तक्रारी होऊन उपोषण ही झाले आहे. या कामावर देखरेख ठेवणाऱ्या यंत्रणेने हे काम चांगल्या दर्जाचे करून घेणे आवश्यक आहे.
शहरातील काही व्यावसायिक त्यांच्या दुकानातील कचरा गटारी मध्ये टाकतात त्यामुळे गटारी तुंबन पाणी रस्त्यावर येते अशा व्यावसायिकावर नगर पंचायत प्रशासन कारवाईच करत नाही. तसेच प्रवरा नदीच्या पुलाच्या रस्त्यावर व्यावसायिक कचरा टाकतात त्याच्यावर ही कारवाई होत नाही.
नगर पंचायतीकडे शहराची दैनदिन स्वच्छता ठेवण्यासाठी विभागात ३६ कर्मचारी आहेत , त्या पैकी १६ झाडु कामगार, ४ वाहन चालक, ७ वाहनाबरोबरील कर्मचारी, २ कार्यालयात व फक्त ७ कर्मचारी गटारी स्वच्छ करण्यासाठी आहेत . यांना मेलेले गाढव, डुक्कर , कुत्रे, मांजर आदी पाळीव प्राण्यांची तसेच बेवारस मृतदेहांची विल्हेवाट लावावी लागते. आठवडा व दैनदिन बाजार वसुली करावी लागते. वास्तविक गटारी स्वच्छ करणेसाठी जास्त कर्मचारी वर्ग आवश्यक आहे. तसेच या कर्मचाऱ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने बुट, हॅन्डग्लोज, मास्क प्रशासनाने दिलेले नाही. स्वच्छ सुंदर व हरित बनविण्याच्या दृष्टीने नगरपंचायतिच्या वतीने स्वच्छ नेवासा माझी जबाबरदारी हे अभियान लोक सहभागातून राबवुन स्वच्छतेबाबत नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी या उद्देशाने आठवड्यातील प्रत्येक रविवारी सकाळी ७ ते १० प्रत्येक प्रभागमध्ये स्वच्छता अभियान रावबिले जात आहे . मात्र यात लोकसहभाग कमी आहे
सतरा प्रभागच्या कचरा संकलनसाठी एक ट्रॅकटर व तीन घंटागाडय़ा आहेत .प्रभाग जास्त व स्वच्छतेसाठी कर्मचारी व वाहने कमी . नियोजनाचा अभाव सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांवर कारवाईचा अभाव यामुळे स्वच्छतेचा बोजवारा उडाला आहे यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे .
चौकट - ओला व सुका कचरा गोळा करण्याची कुठलीही व्यवस्था नाही . त्याचबरोबर पर्यावरणास घातक असलेला प्लास्टिक कचऱ्याची देखील मोठी समस्या आहे. - डॉ. शंकरराव शिंदे