Breaking News

शिक्षकांच्या वादामुळे ग्रामस्थांंनी ठोकले शाळेस कुलूप



श्रीगोंदा / प्रतिनिधी 
भानेश्‍वर विद्यालय भानगाव येथे शाळेतील शिक्षकांच्या अंतर्गत वादाच्या कारणावरून अखेर पंचायत समिती सदस्य सुरेश गोरे, सरपंच आबासाहेब शितोळे, माजी उपसरपंच उत्तम कण्हेरकर आणि ग्रामस्थांनी आज शाळेला कुलूप ठोकले.
याबाबत ग्रामस्थांकडून समजलेली माहिती अशी की, भानेश्‍वर विद्यालय हे समाज सेवा विद्या प्रसारक मंडळ अहमदनगर यांचे असून, या विद्यालयात गावातील आणि बाहेरील शिक्षक आणि कर्मचारी येथे काम करत आहेत.
यावेळी विद्यालय सुरू झाले, मात्र याच विद्यालयातील बाहेर गावावरून येणार्‍या शिक्षकांनी मुख्याध्यापकांना विश्‍वासात न घेताच, शाळेत काही कार्यक्रम राबविला, यातून काही गैरसमज निर्माण झाले, यामुळे शाळा बंद करण्याची वेळ ग्रामस्थांवर आली.
शाळा बंद झाल्याची माहिती मिळताच पंचायत समितीचे अधिकारी सय्यद आणि नगर येथून माध्यमिकचे पदाधिकारी पवार तसेच गावचे पदाधिकारी आणि शिक्षक यांची बैठक होऊन, यापुढे शाळेचे मुख्याध्यापक यांचा शाळेविषयी अंतिम निर्णय राहील हे सर्व शिक्षक यांनी मान्य केल्याने तोडगा निघाला.
 
ज्या विद्या प्रसारक मंडळाची ही संस्था आहे, त्यांचाच कोणी तरी येथे नातेवाईक काम करतो, मात्र कामावर उपस्थित राहत नाही, मग त्या कामगाराचा पगार या विद्यालयातून दिला जातो काय? अशी शंका येथील ग्रामस्थांमध्ये आहे.