Breaking News

परशुराम वाघमारेची चौकशी महाराष्ट्र एसआयटी करणार

एसआयटीचे अधिकारी कर्नाटक पोलिसांच्या संपर्कात 
पुणे : कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येचा तपास करणार्‍या महाराष्ट्र पोलिसांच्या एसआयटीकडून परशुराम वाघमारेची चौकशी होणार. ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येची कबुली देणार्‍या परशुराम वाघमारेचा ताबा घेण्यासाठी महाराष्ट्र एसआयटी बंगळुरुला जाऊन न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करणार आहे. एसआयटीचे अधिकारी कर्नाटक पोलिसांच्या संपर्कात आहेत. गौर लंकेश यांच्या हत्येप्रकरणी आधी मे महिन्यात तिघांना अटक करण्यात आल्यानंतर महाराष्ट्र एसआयटीच्या अधिकार्‍यांनी बंगळुरुला जाऊन त्यांची चौकशी केली होती. आता परशुराम वाघमारेचीही चौकशी करण्यासाठी एसआयटीची टीम जाणार आहे. गौरी लंकेश यांच्या हत्येसाठी वापरलेली बंदूकच एमएम कलबुर्गी आणि कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येसाठी वापरल्याचे कर्नाटक पोलिसांनी फॉरेन्सिक लॅबच्या अहवालानंतर सांगितले. पानसरे यांच्या हत्येसाठी दोन पिस्तुलांचा वापर करण्यात आला होता. त्यातील एक पिस्तुल गौरी लंकेश आणि कलबुर्गी यांच्या हत्येसाठी वापरण्यात आली, तर दुसरी पिस्तुल डॉ. दाभोलकर यांच्या हत्येसाठी वापरण्यात आल्याचे कर्नाटक पोलिसांनी म्हटले आहे. कोल्हापूर पोलीस आणि महाराष्ट्र एसआयटी कर्नाटक एसआयटीच्या संपर्कात असून, न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करून संशयित वाघमारे याचा ताबा घेण्याच्या हालचाली सुरू आहेत.
कॉम्रेड गोविंद पानसरे, डॉ. एम. एम. कलबुर्गी आणि पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येसाठी एकाच पिस्तुलाचा वापर केल्याचे समोर येत आहे. यामुळे कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी देखील संशयित वाघमारे याचेकडून महत्वाचे धागेदोरे हाती लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे वाघमारे याला महाराष्ट्र एसआयटीने ताब्यात घावे, अशी मागणी मेघा पानसरे यांनी केली आहे. गौरी लंकेश यांची हत्या परशुराम वाघमारेसह साथीदारांनी केल्याचा निष्कर्ष कर्नाटकातील विशेष पथकाने काढला आहे. याप्रकरणी 6 जणांना अटकही करण्यात आली आहे. पुरोगामी चळवळीतील तिन्ही नेत्यांची हत्या एकाच पिस्तुलातून झाल्याचे कर्नाटकातील फॉरेन्सिक लॅबच्या अहवालात उघड झाल्याचे वरिष्ठ सूत्राकडून सांगण्यात आले आहे.