Breaking News

विषारी मधमाशांच्या चाव्याने शेतकरी घायाळ

शेतातील काम करत असताना आगी मोहोळाला धक्का लागल्याने, कर्जत तालुक्यातील कोपर्डी येथील दादा सुद्रीक यांना मधमाशांनी चावे घेवून गंभीर जखमी केले.गुरुवारी दुपारी दीडच्या सुमारास ही घटना घडली. ते सध्या कर्जत येथे उपचार घेत आहेत.

कोपर्डीनजीकच्या हरणवाडी येथील दादा हरीभाऊ सुद्रिक हे शेतात पेरणीपूर्व मशागतीचे काम करित होते. काम करत असताना त्यांचा विषारी मधमाशांच्या मोहोळाला धक्का लागला. तेवढ्यात मधमाशा त्यांच्यावर तुटुन पडल्या.त्यांच्या अंगाला जागोजागी चावे घेतल्याने ते गंभीर जखमी झाले. ते धावत घरी आले, मात्र मधमाशांनी त्यांचा पाठलाग सोडला नाही. मधमाशांनी त्यांच्या चेहर्‍यावर, मानेवर हातावर कडाडून चावे घेतल्याने ते गंभीर जखमी झाले.काही वेळातच ते बेशुद्ध पडले. त्यांना तात्काळ कर्जतच्या राऊत मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. डॉक्टरांच्या पथकाने त्यांच्यावर तात्काळ उपचार सुरु केले. त्यांच्या अंगावरील विषारी काटे काढण्यात आले असुन, सध्या उपचार सुरु आहेत. त्यांच्या तब्बेतीत सुधारणा होत असल्याचे डॉ. रविंद्र राऊत यांनी सांगितले.