चार दहशतवाद्यांचा खात्मा पाकिस्तानच्या कुरापतींना भारतीय सीमा सुरक्षा दलाचे चोख उत्तर
बांदिपोल : जम्मू आणि काश्मीरच्या बांदिपोरा भागात सोमवारी सकाळी सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवाद्यांत चकमक उडाली. यात भारतीय जवानांनी चार दहशतवाद्यांना कंठस्नान घातल्याचे समजते. अद्यापही चकमक सुरुच आहे. नुकतेच गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी शस्त्रसंधीबाबतचा निर्णय लांबवला जाणार नाही. तसेच दहशदवाद्यांविरुद्धच्या कारवाईसंदर्भात लष्कराला सूचना दिल्यानंतरचा हा पहिलाच दहशतवादी हल्ला आहे. यावेळी, दहशतवाद्यांनविरोधात आवश्यक ती कारवाई क रण्याचे आदेश गृहमंत्रालयाने रविवारी लष्कराला दिले. गेल्याकाही दिवसांपासून जम्मू आणि काश्मिरात दहशतवादी कारवाया मोठ्या प्रमाणावर वाढल्याचे दिसत आहे. जम्मू आणि काश्मीरच्या श्रीनगर भागात शुक्रवारी दहशतवाद्यांनी गस्तीवर असलेल्या पोलिसांवर हल्ला केला. यात दोन पोलीस कर्मचारी आणि एक नागरिक जखमी झाला होता.
रमजान महिना संपताच जम्मू-काश्मीर खोर्यात भारतीय सैन्याने ‘ऑपरेशन ऑलआऊट’ला पुन्हा सुरुवात केली होती. ‘ऑपरेशन ऑलआऊट’अंतर्गत भारतीय सैन्याने सोमवारी चार दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. त्यामुळे रमाजान महिन्यात पाकिस्तानने केलेल्या कुरापतींना चोख उत्तर देणार असल्याचे मनसुबे लष्काराने स्पष्ट केले आहेत.
बांदीपोरामधील पनारच्या जंगलात सोमवारी चार दहशतवाद्यांना कंठस्नान घातल्याची अधिकृत माहिती लष्कराने दिली. दहशतवाद्यांविरोधात सुरु असलेल्या आ ॅपरेशनदरम्यान लष्करप्रमुख बिपीन रावत स्वत: काश्मीर खोर्यात उपस्थित आहेत. बिपीन रावत यांनी शहीद औरंगजेबच्या कुटुंबीयांचीही यावेळी भेट घेतली.
‘ऑपरेशन ऑलआऊट’
रमजान महिन्यात जम्मू-काश्मीरमध्ये लागू करण्यात आलेली शस्त्रसंधी केंद्रीय गृहमंत्रालयाने मागे घेतली आहे. केंद्र सरकारकडून ‘सस्पेंशन ऑफ ऑपरेशन’ या मिशनअंतर्गत 17 मे 2018 ला शस्त्रसंधी लागू करण्यात आली होती. याअंतर्गत दहशतवाद्यांविरोधात चालू असलेल्या ‘ऑपरेशन ऑलआऊट’ला स्थगिती देण्यात आली होती. ‘ऑपरेशन ऑलआऊट’थांबवल्याने दहशतवाद्यांनी त्याचा गैरफायदा घेत रमजानच्या पवित्र महिन्यात जवळपास 66 हल्ले केले. या हल्ल्यात 14 भारतीय जवान शहीद झाले, तर 7 नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले होते.
