‘फेसबुक’ची मैत्रिण अखेर मिळाली शिर्डीत!
शिर्डी/ किशोर पाटणी : राजस्थानमधील उदयपूरच्या तरुणाशी अल्पवयीन असलेल्या उत्तरप्रदेशच्या ‘ती’ची फेसबुकवर मैत्री झाली. त्याने तिला उदयपूरला बोलावून घेतले आणि घरच्यांना काही सांगितले, तर तुझ्या आई-वडिलांचे बरे-वाईट करीन, अशी धमकी दिली. दरम्यान. त्यानंतर त्या तरुणाने शिर्डीत फेसबुकवर ओळख असलेल्या दुसऱ्या तरुणीशी संपर्क साधून या मुलीला काही काळ तुमच्याकडे राहू द्या, असे सांगितले आणि ही मुलगी शिर्डीच्या शिवाजीनगर येथे एका परिवारासोत ती राहू लागली. दरम्यान, तिच्या बेपत्ता होण्याची खबर उत्तरप्रदेशमधील छाप्रोली पोलीस ठाण्यात ९ महिन्यांपूर्वी दाखल करण्यात आली होती. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आदेश देताच सूत्र हलली आणि या मुलीचा शोध लागला.
उत्तरप्रदेशमधील डागपत येथील छाप्रोली गावातून ९ जुलै २०१७ रोजी ही मुलगी बेपत्ता झाली होती. रेणू गिरीश जोशी {वय १६ } असे या मुलीचे नाव आहे. उत्तरप्रदेश पोलिसांनी अत्यंत गोपनीयरित्या केलेल्या तपासात या मुलीच्या बेपत्ता होण्याचे रहस्य उलगडले. या मुलीला तिच्या आई-वडिलांकडे त्रास होतो, असे सांगून त्या तरुणाने तिला शिर्डीत आश्रय उपलब्ध करून दिला. गेल्या ९ महिन्यांपासून ही मुलगी शिर्डीत त्या कुटुंबाच्या घरात राहत होती. मात्र सदर मुलीने उत्तरप्रदेशला केलेला एक फोन, पोलिसांना मिळालेले मोबाईलचे लोकेशन आणि थेट योगी आदित्यनाथ यांनी घातलेले लक्ष यामुळे उत्तरप्रदेशचे पोलीस अधिकारी हृषीपालसिंघ राहत व मुलीचे आई-वडील पोलीस कर्मचारी बिपीनकुमार हे थेट नगरला आले. जिल्हा पोलीस प्रमुख रंजनकुमार शर्मा यांची त्यांनी भेट घेतली आणि संपूर्ण घटना सांगितली. त्यानुसार शर्मा यांनी शिर्डी पोलीस स्टेशनचे पो. नि. प्रताप इंगळे यांना या मुलीचा शोध लावण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतर शिर्डी पोलीस आणि उत्तरप्रदेश पोलीस मोबाईलच्या आधारे एका घरातून या अल्पवयीन मुलीला ताब्यात घेऊन उत्तरप्रदेशला रवाना करण्यात आले.
