Breaking News

अतिक्रमण धारकांना नगराध्यक्षांचा दिलासा


नेवासा : लक्ष्मीनगरच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात शासकीय जागेवर राहणाऱ्यांना त्याच जागेवर घरे देण्याचा कोर्टाचा आदेश आहे. त्यामुळे नेवाशातील अतिक्रमण धारक रहिवाशांनी घाबरू नये असे आवाहन नगराध्यक्षा संगीता बर्डे यांनी केले आहे.
नेवासा नगर पंचायत हद्दीमध्ये शासकीय जागेवर राहणाऱ्यांना भूमापन खात्याकडून सर्व्हेक्षणाच्या नोटीसा आल्या आहेत. वास्तविक नगरपंचायत झाल्यानंतर शहरातील शासकीय अतिक्रमित जागेवर राहणाऱ्याच्या नावावर भोगवटा लावण्याचा प्रस्ताव नगर पंचायतीने केला आहे व त्यासाठी सर्व्हेही सुरु झाला आहे. या सर्व्हेसाठी त्यांच्याकडून अर्जही मागवले जात आहेत. हे स्पष्ट करून नगराध्यक्षा म्हणाल्या कि, रमाई घरकुल योजना नगर पंचायत हद्दीत राबवण्यास तांत्रिक अडचण असल्याने नगर पंचायत हद्दीमध्ये पंतप्रधान आवास योजना राबवावी यासाठी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी नामदार प्रकाश मेहता यांच्याकडे पाठपुरावा करून तसे परवानगीचे पत्रही मिळवले आहे . त्यामुळे आता नेवाशात एकही कुटुंब बेघर राहणार नाही. तसेच उच्च न्यायालयाने दिलेल्या २३ जून २०१५ रोजी राजेंद्र निंबाळकर यांच्या याचिकेमध्ये २००२ च्या शासन निर्णयानुसार अतिक्रमण धारकांना मालकी हक्काचे उतारे देण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत व त्याची कारवाई चालू आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांनी घाबरू नये व हे सर्व नागरिक नेवाशातीलच रहिवाशी असल्याने या सर्वांना घरकुले मिळणारच आहे असेही त्यांनी सांगितले.


 सदरच्या नोटीसा या दरवर्षीची नेहमीची प्रक्रिया असून शासकीय जागेच्या पुनविलोपनासाठी या नोटीसा देण्यात आलेल्या आहेत. यावर त्यामध्ये अतिक्रम काढण्याचा उल्लेख नसून नागरिकांकडून खुलासा व पुरावे मागण्यात आलेले आहेत. --- सुजित जाधव, तालुका भूमापन अधिकारी .