Breaking News

वादळी वार्‍याने अनेकांचे संसार उघड्यावर डाळिंब, लिंबू, आंब्याच्या फळबागा भूईसपाट

श्रीगोंदा तालुक्यातील येळपणे, कामठी परिसरात झालेल्या तुफान वादळी वार्‍याने शेतकर्‍यांच्या घरांचे पत्रे उडाले, शेतकर्‍यांच्या कांदा चाळींचे अतोनात नुकसान झाले. डाळिंब, लिंबू, आंबा आदी फळबागा वादळात उन्मळून पडल्या तर, अनेक शेतकर्‍यांची उभी असणारी उसाची पिके भुईसपाट झाली.

श्रीगोंदा तालुक्यात कालरोजी सायं. 4 वाजण्याच्या सुमाराला आलेल्या तुफान वादळी वार्‍याने, मांडवगण परिसरातील कामठी गावच्या हद्दीत घरांचे पत्रे उडाले, विजेचे पोल पडले, तर कांदा चाळ पडल्या, येळपणे परिसरात याच सुमारास आलेल्या वादळात खंडेश्‍वर विद्यालयाचे तीन खोल्यांचे पत्रे उडाले, सुदैवाने शाळा सुटली असल्याने दुर्घटना घडली नाही. पिसोरे येथील कांतीलाल काळे तसेच बन्सीलाल नढे यांचे घराचे पत्रे उडाले. सुनील धावडे, ज्ञानदेव धावड, मुरली नढे, संदीप क्षीरसागर, राजेश सांगळे यांच्या फळ बागांचे नुकसान झाले. या वादळात इतरही घरांचे पत्रे उडाली आहेत.

तातडीने पंचनामे करा
श्रीगोंदा तालुक्यातील येळपणे, पिसोरे परिसरात झालेल्या वादळी वार्‍यामध्ये शेतकर्‍यांचे आतोनात नुकसान झाले. शेतकर्‍यांचे घरांचे पत्रे उडाले असल्याने संसार उघड्यावर आले. त्यांना तातडीने मदत मिळावी, तसेच डाळिंब फळबागा आणि लिंबू, आंबा बागा उध्वस्त झाल्या असल्याने, शेतकर्‍यांना तातडीने पंचनामा करून नुकसान भरपाई देण्याची मागणी गामपंचायत सदस्य संदीप पवार आणि सेवा संस्था उपाध्यक्ष संभाजी धावडे यांनी केली.