Breaking News

वाहतूक नियमांची कर्जत शहरात पायमल्ली तब्बल 2 तास चक्का जाम, 2010-11 च्या तुलनेत वाहतूनांच्या संख्येत 5 पटींनी वाढ

मागील काही वर्षापासून झपाट्याने वाढत जाणार्‍या वाहनसंख्येबरोबरच शहरातील वाहतूकीची बेशिस्तही वाढत चालल्याचे चित्र आहे. वाहतूक नियमांची ऐशीतैशी करीत बेलगाम वाहनचालकांकडून वाहतूक नियमांचे सर्रासपणे उल्लंघन केले जात असल्याचे दिसून येत आहे. याबाबत प्रशासन ढीम्म असून वाहतुकीची स्थिती सुधारण्यासाठी कोणत्याही ठोस उपाययोजना केल्या जात नाहीत. त्यामुळे कर्जतकरांवर सावधान म्हणण्याची वेळ आली आहे.

कर्जत शहरासह लगतचा भाग, तसेच तालुक्यातील मोठ्या गावांच्या विकासाची गती वाढली आहे. कर्जतकडे येण्याचा लोकांचा ओढा वाढत चालला आहे. परिणामी, कर्जत शहरातील वाहनांच्या संख्येतही भर पडत चालली आहे. उपप्रादेशीक परिवहन विभागाकडे सन 2010-11 च्या तुलनेत पाच पटीने वाहनांची नोंदणी वाढली आहे. झपाट्याने वाहनांच्या संख्येत वाढ झाली असली तरी, पोलीसांचा दरारा मात्र त्याच गतीने घसरत चालला आहे. वाहतूक पोलीसांना वाहनचालक जूमानतच नसल्याचे चित्र तालुक्यात विशेष: कर्जत शहरात पहावयास मिळत आहे. हे मात्र पोलीसांच्या प्रतिमेवर काळा डाग आहे.
एकीकडे वाहनांच्या संख्येत वाढत असताना रस्ते मात्र, अरूंद होत आहेत.नेहमीचा वापरातील रस्ता असुनही बेशिस्तपणे उभ्या असणार्‍या वाहनांमुळे रहदारीचा असलेला रस्ता कमी पडू लागला आहे. याला एकच कारण वाहतूक शाखा पोलीसांचा धाक राहीला नसल्याचे दिसून येते. रस्त्यावरील वाहतुकीचा ताण दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. वाढत्या वाहनांना शिस्त लावण्यासाठी उपाययोजना पो.नि. देशमुख यांच्या कार्यकाळात करण्यात आल्या, मात्र पुढील काळात पो.निरीक्षकांनी वाहतुकीच्या बेशिस्तीकडे पुर्णपणे डोळेझाक केल्याने वाहतुकीचा व वाहनांना शिस्त लावण्याची समस्या तोंड वासुन उभी आहे.
बेशिस्तपणा आटोक्यात आणण्यासाठी महसूल, पोलीस, उपप्रादेशिक परिवहन विभाग, नगरपंचायत, बांधकाम विभागासह अन्य संबंधित विभागांकडून त्यावर ठोस उपाय करण्यात न आल्याने वाहतुकीचा प्रश्‍न बिकट बनला आहे. भविष्यात ही समस्या उग्र रूप धारण करण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाने आता तरी जागे होत विविध उपाययोजना करण्याची आवश्यकता असल्याची कर्जतकरांची इच्छा आहे.


उपाययोजना शुन्य
सुरळीत वाहतुकीसाठी काही चौकांमध्ये व गर्दीच्यावेळी नियमासाठी होमगार्डची नियुक्ती केली जाते. मात्र वाहनचालक त्यांनाही जूमानत नाहीत.
नियमांचे सर्रास उल्लघन केले जाते.
पार्कींगच्या जागा निश्‍चित करण्यात आलेल्या नाहीत.
सर्वत्र रस्त्यावर मिळेल त्या, ठिकाणी मोटार सायकली व चार चाकी वाहने उभी उभी केली जातात.
ट्रीपल सीट, मोबाईलवर बोलत दुचाकी चालवणे, रस्त्याच्या विरूद्ध दिशेने वाहन घुसविणे असे पहावयास मिळते.

नियमांचे उल्लंघन
कर्जतच्या मुख्य रस्त्यावर एस.टी. बसस्थानकाजवळ व कोर्टाजवळ नो पार्कींग झोनचे फलक लावण्यात आले आहेत. मात्र वाहनचालकांकडून त्याकडे दुर्लक्ष करीत वाहने पार्क केली जात आहेत. परंतु ट्रॉफीक पोलीसांकडून अर्थपुर्ण संबंधांतून मुद्दामहून दुर्लक्ष होते. काही वेळा पोलीसांनाही जूमानले जात नाही. त्यामुळे नेहमी वर्दळ असलेल्या मुख्य रस्त्यावर वाहतूक कोंडी नेहमीची झाली आहे.

मुख्य रस्त्यावर वारंवार वाहतूकीचा चक्का जाम होत आहे. मात्र पोलीसांना कोणतेच सोयरसुतक नाही. आज तर शहरामध्ये रास्ता रोको आहे की, काय असा प्रश्‍न नागरिकांना पडला. तब्बल दोन तासापेक्षा अधिक काळ वाहतूक ठप्प झाली होती. मात्र वाहनधारकांडून सतत कर्णकर्कष हॉर्नची चढाओढ लागली होती. दोन तासांपेक्षा जास्त वाहतूक कोंडीने नागरिक अक्षरशः मेटाकुटीस आले.