Breaking News

मनपाचे बेपत्ता सहाय्यक अभियंता रवींद्र पाटील अखेर नाशकात देवदर्शनाने झाली उपरती, मुंडे द्वेषी प्रवृत्ती आदळल्या तोंडावर

नाशिक : गेले सहा दिवस बेपत्ता असलेले मनपा नगररचना विभागाचे सहाय्यक अभियंता रवींद्र पाटील यांना देवदर्शनानंंतर पोलीसांनी काल पुण्याहून पहाटे घरी आणले, त्यामुळे गेल्या सहा दिवसाच्या नाट्यमय घडामोडी आणि संमिश्र चर्चेला पूर्णविराम मिळाला.

गेल्या शनिवारी सकाळी आठ वाजता घरी वाक विथ कमिशनर कार्यक्रमाला जातो असे सांगून रविंद्र पाटील स्वतः च्या गाडीत मोबाईल ठेवून चिठ्ठी लिहून बेपत्ता झाल्याने संपुर्ण महानगर पालिका हादरली होती. रवींद्र पाटील बेपत्ता झाल्याने महानगर पालिकेत विविध चर्चांना ऊत आला होता तो ऊत शनिवारी शमला.
शनिवारी रवींद्र पाटील यांनी नाशिकहून थेट उज्जैनला गेले तेथे महाकाल देवाचं दर्शन घेऊन इंदोरला गेले. त्यानंतर इंदोरवरून थेट नरसोबाचीवाडी येथे आले. तिथून पुण्याला आले आणि पुण्यातून नंतर कोल्हापूर, गाणगापूर, अक्कलकोट असे देवदर्शन करीत पुण्यात परतत असतांना एका टॅक्सी ड्रायव्हरच्या माध्यमातून रवींद्र पाटील यांचे साडू संजय पाटील यांच्या मोबाईल वर संपर्क केला. तेव्हा गंगापूर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक कोल्हे व पोलीस कर्मचारी चौधरी हे पाटील यांचे बंधू जितेंद्र पाटील व साडू संजय पाटील पुण्यात शोध घेत होते. पाटील यांचे सोबत मोबाईल वर संभाषण झाल्यानंतर रात्री बाराच्या सुमारास रवींद्र पाटील पुण्यात दाखल झाले. त्यानंतर पाटील यांचे बंधू आणि पोलीस उप निरीक्षक क ोल्हे यांनी पुण्यातुन पाटील यांना नाशिकला सकाळी सहा वाजता घरी आणले, अशी माहीती गंगापूर पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक कोल्हे यांनी दिली.

पाटलांना कामाचे टेन्शन
कामाचा व्याप वाढल्यामुळे पाटील प्रचंड टेन्शन मध्ये आलेले होते. अतिक्रमणचा त्यांना त्रास होत होता मात्र, नैराश्य हे त्यांच्या बोलण्यातून जाणवले नाही. पोलिसांनी पाटील यांच्या शोधार्थ शहरात तीन पथक आणि परराज्यासाठी तीन पथक नेमली होती. त्यातील एक पथक पुण्यात आणि दुसरे पथक उज्जैन व इंदोर येथे तपास करीत होते, असे पोलीस उपनिरीक्षक कोल्हे यांनी सांगितले

ई-मेल अकाउंटमुळे लागला पुण्याचा ट्रेस
देवदर्शन करून पुण्यात आलेल्या पाटील यांनी एका सायबर कॅफेत जाऊन आपले ई-मेल अकाउंट उघडून बघण्याचा प्रयत्न केला मात्र, मोबाईल नसल्यामुळे ई-मेल अकाउंट उघडता आले नाही आणि नाशिकची सायबर शाखा पाटील यांच्या हालचालीवर बारीक लक्ष ठेवून असल्याने इथेच पाटील सापडले आणि पुण्यात असल्याचा एक भक्कम पुरावा हाती लागला. त्यानंतर स्थानिक पोलिसांनी चक्र वेगात फिरवली आणि पुणे शहर गाठले होते.

पाटील यांच्या भेटीला गर्दी
रवींद्र पाटील सकाळी घरी परतल्याचे कळताच नगरसेवक, बिल्डर, अनेक वास्तू विशारद, अभियंते मित्र परिवार यांनी पाटील यांची भेट घेतली.
अभियंता पाटील हे बेपत्ता झाल्याचे वृत्त वार्‍यासारखे पसरल्यानंतर महापालिका वर्तुळाशी संबंधित अनेक विद्वान अकलेचे तारे तोडून या प्रकरणाचे खापर मनपा आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या कार्यशैलीवर फोडून आपले इप्सित साध्य करू लागले होते. कुणी मनपा आयुक्तांच्या जाचामुळे प्रशासन त्रस्त असून रविंद्र पाटील यांचे बेपत्ता होणे या जाचाचा एक भाग असण्यापर्यंत जावई शोध लावला होता. तथापी रविंद्र पाटील हे परत येऊन त्यांनी दिलेल्या खुलाशानंतर ही मंडळी तोंडावर आदळली आहे. दरम्यान या प्रकरणाची फाईल तुर्तास पोलीसांनी बंद केली असली तरी खोल चौकशी झाल्यास आणखी काही कुट खेळगडी या प्रकरणात सहभागी असल्याचे निष्पन्न होण्याची शक्यता मनपा वर्तुळात व्यक्त होत आहे.