Breaking News

लोंबकळलेल्या तारांमध्ये वीजप्रवाह ; महाविद्यालयीन युवकाचा मृत्यू ‘महावितरण’विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी

राहुरी विशेष प्रतिनिधी 

तालुक्यातील वळण येथील महाविद्यालयीन युवकाला महावितरण विभागाच्या गलथान कारभारामुळे जीव गमवावा लागला. या शेतात वीजेच्या लोंबकळलेल्या तारांमध्ये वीजप्रवाह उतरल्याने ही घटना घडल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थांमधून केला जात आहे. या भोंगळ कारभारामुळे संबंधित महाविद्यालयीन युवकाच्या मृत्यूला कारणीभूत ठरल्याप्रकरणी महवितरणच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांमधून केली जात आहे. 

तालुक्यातील वळण येथे राहत असलेला १९ वर्षीय महाविद्यालयीन युवक गणेश गाढवे हा सोमवारी {दि. ४} सकाळी वळण-टाकळिमियाँ रस्त्यालगत असलेल्या ऊसाच्या शेतात जनावरांना शेतात गवत घेण्यासाठी गेला होता. मात्र तेथे विजेच्या तारा खाली असल्याने त्याच्या लक्षात आले नाही. या तारांचा धक्का लागल्याने तो गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी राहुरी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र वैद्यकीय अधिकारी यांनी त्याला उपचारापूर्वीच मृत असल्याचे घोषित केले. याप्रकरणी राहुरी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली. गणेश गाढवे हा बारवी परिक्षेत ६१ टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाला होता. दरम्यान, चार दिवसांपूर्वी या परिसरात वादळाने वीजेचे खांब पडून वीजप्रवाह सुरु असलेल्या तारा खाली आलेल्या होत्या. पण महावितरण विभागाकडून कुठलीही दखल घेण्यात आली नाही. 

चौकट

‘महावितरण’विरुद्ध नातेवाईकांचा आरोप 

या भागांत काही ठिकाणी तारा नादुरुस्त आहेत. अनेकठिकाणी तारांमध्ये घोळ पडलेला आहे. शेतकरी व ग्रामस्थांनी वेळोवेळी तक्रारी करुनही महावितरकडून दखल घेतली जात नाही. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये महावितरण विभागाबाबत तीव्र संताप व्यक्त होत आहे. सदर घटना ही महावितरण विभागाच्या निष्काळजीपणामुळे झाल्याचा आरोप मयत युवकाच्या नातेवाईकांनी केला आहे.