Breaking News

भैय्यूजी महाराज आणि पारनेर तालुक्याचे अतुट नाते पारनेर तालुक्यात हळहळ व्यक्त

राष्ट्रसंत उदयसिंह देशमुख उर्फ भैय्युजी महाराज यांनी इंदोर येथील राहत्या घरी स्वतःवर गोळी घालून आत्महत्या केल्याची बातमी समजताच पारनेर तालुक्यात सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात आली. तसं पाहिलं तर भैय्यूजी महाराज आणि पारनेर तालुक्याचे नाते वीस बावीस वर्षांचे, पारनेर तालुक्याचे आ. विजय औटी तसेच तालुक्यातील अनेक भाविक भक्तांचे ते अध्यात्मिक गुरु राहिले आहेत, पारनेर तालुक्यात त्यांचा मोठा भक्त परिवार आहे 

कोरठण खंडोबा देवस्थानवर महाराजांची विशेष श्रद्धा होती. या जागृत देवस्थानला वर्षातून एक-दोनदा दर्शनासाठी येणे-जाणे चालू झाले. त्यात तालुक्यातील पारनेर, लोणी हवेली येथील तरुणांनी आधीपासूनच महाराजांचे शिष्यत्व पत्करले होते. दिवसेंदिवस भैय्यूजी महाराजांचे शिष्य वर्ग तालुक्यात वाढत होते. महाराजांचे सामाजिक कामात विशेषतः तरुण वर्ग झोकून काम करीत होता. अध्यात्माला विज्ञानाची जोड देऊन, तरुण मुलांना मार्गदर्शन करीत असतानाच, सामुदायिक सोहळ्यापासून सद्गुरू दत्त व पारमार्थिक ट्रस्ट इंदोर व पारनेर येथील नागेश्‍वर मित्र मंडळ, नंतर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्याबरोबर मुला-मुलींचे विवाह फक्त सव्वा रुपयात महाराजांच्या सूर्योदय परिवाराने लावले. हे विवाह लावत असतानाच भैय्यूजी महाराज यांनी दुष्काळी पारनेर तालुक्यातील पाणी हा गहन प्रश्‍न ओळखून जलसंधारणाची कामे स्वखर्चाने हाती घेऊन ती पूर्ण केली. अनेक तलाव स्थानिकांच्या मदतीने सुर्योदय परिवाराने उभारले तर, भैय्यूजी महाराजांनी रस्ता अपघातात अनेकांचे जीव जात असल्याने अण्णा हजारे युवा विचार मंच सोबतीने स्वखर्चातून रुग्णांना मोफत अ‍ॅम्ब्युलन्स सेवा गेल्या दहा वर्षांपासून नगर-पुणे महामार्गावर अविरतपणे सुरू ठेवली आहे. तसेच गरीब अनाथ लोकांसाठी धान्यबँक योजना, आत्महत्या करणार्‍या कुटुंबाना आर्थिक मदत व वृक्ष लागवड अशा विविध योजना भैय्यूजी महाराज यांनी पारनेर तालुक्यात रुजवल्या आहेत. 
शिर्डीतील साईबाबा, शनिशिंगणापूर येथील शनिदेव यांच्यावर असणारी श्रद्धा इतकीच त्यांनी कोरठण खंडोबा मंदिरावर केली. दरवर्षी चंपाषष्ठी उत्सव व यात्रोत्सव यांना हजेरी लावत होते. तर कोरठण खंडोबा देवस्थानला ब वर्ग दर्जा मिळवून देण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. 
तालुक्यातील तरुणांना नोकरीच्या वाटा दाखवताना त्यांनी कधी अंधश्रेद्धेचा आधार घेतला नाही. कारण त्यांनी आध्यात्म व विज्ञान यांचा मेळ घालत भक्तांना दिशा देण्याचे काम केले. भैय्यूजी महाराजांच्या अकाली जाण्याने तालुक्यात शोक व्यक्त होत आहे.