Breaking News

शिक्षकांचे पाच वर्षात पंधरा वर्षाचे काम : झावरे


सुपा / प्रतिनिधी 
पारनेर तालुक्यातील सुपा येथिल जांभूळवाडीतील शिक्षकांनी पाच वर्षात पंधरा वर्षाचे काम केले असल्याचे, प्रतिपादन पारनेरचे गटशिक्षणाधिकारी संभाजी झावरे यांनी केले.
जांभूळवाडी शाळेतील बदली झालेल्या, शिक्षकांचा निरोप समारंभ गुरुवारी पार पडला, याप्रसंगी झावरे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विस्तार अधिकारी शोभा मगर होत्या. यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दत्तात्रय कुसाळकर, ग्रामपंचायत सदस्या शोभा बाळासाहेब पवार आदी उपस्थित होते.
शाळेतील राज्य व जिल्हा पुरस्काराने गौरविलेले शिक्षक संतोष मगर व लता गट यांचा शाळेच्या वतीने सन्मान करण्यात आला. हे दोन्ही शिक्षक 5 वर्षापूर्वी या शाळेत रूजू झाले होते. पाच वर्षात शाळेचा पट 17 वरून 130 वर नेला, शाळेस आयएसओ मानांकण, प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र सर्धेत तालुकास्तरीय यश व इतर अनेक उपक्रमांमुळे ही शाळा नेहमीच चर्चेत राहिली.
इंग्रजी माध्यमांची 65 मुले या शाळेत दाखल झाल्याने, गेल्या वर्षी नागपूर हिवाळी अधिवेशनात उपाध्यापक संतोष मगर यांचा गौरव करण्यात आला. सतत नवीन काहीतरी करण्याची धडपड असणार्‍या लता गट व संतोष मगर यांनी शाळेत लेझीम पथक, झांज पथक, गॅदरिंग, योगा व कराटे, स्पोर्ट ड्रेस, ऐतिहासिक ठिकाणांच्या सहली, संस्कार वर्ग असे अनेक उपक्रम राबवून शाळेस राज्याच्या नकाशात मानाचे स्थान मिळवून दिले.
या दोन्ही शिक्षकांनी पाच वर्षात 10 लाख रुपये शैक्षणिक उठाव करुन शाळेस अ‍ॅपेक्स कलर, तार कंपाऊंड, वृक्षारोपन, खेळणी, कम्प्यूटर, प्रोजेक्टर, साऊंड सिस्टीम, ढोल, ताशा, लेझीम, झांज आदी बाबींचा लोकसहभाग घेतला आहे.
शाळेसाठी पाच लाख रुपये लोकसहभागातून 1100 स्के. फूटाचे प्रेरणा सभागृह बांधले आहे. स्व. पोपट पवार यांच्या प्रेरणेतून बांधलेल्या या सभागृहात प्रोजेक्टर, साऊंड सिस्टम इत्यादी बाबी असून तालुक्यातील जि.प. शाळांसाठी हे डिजिटल सभागृह रोल मॉडेल आहे.
शाळेस राज्याचे शिक्षण आयुक्त धीरज कुमार, सिईओ शैलेश नवाल, शिक्षणाधिकारी अशोक कडूस यांच्यासह हजारो शिक्षकांनी भेटी दिल्या आहेत. एवढे काम उभे करणार्‍या शिक्षकांची बदली झाल्याने, पालक व मुलांच्या डोळ्यात अश्रू अनावर झाले.ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, सिईओ यांना सह्यांचे निवेदन देवूनही बदली थांबली नाही. जांभूळवाडीसारख्या इतरही शाळा सुधरायच्या आहे अशिच उत्तरे मिळाली.
यावेळी केंद्र प्रमुख बाळासाहेब साबळे, अरूण पवार, विलास पवार, जावेद पेंटर, प्रविण जवक, सुभाष मगर, पौर्णिमा पठारे, रेखा पवार, बाळासाहेब पवार यांच्यासह पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन मनिषा ताजवे व चाकणे मॅडम यांनी केले. सूत्रसंचालन कांता बनकर यांनी, तर आभार सुवर्णा पवार यांनी मानले