Breaking News

पर्यावरण जागृतीसाठी अभ्यासक्रमात स्वतंत्र धडे

पर्यावरणाचे महत्त्व पटविण्याबरोबरच विद्यार्थ्यांमध्ये वाढत्या प्रदूषणाला रोखण्यासाठी पर्यावरणाविषयी जागरुकता निर्माण करण्याचा प्रयत्न शालेय अभ्यासक्रमातून केला जात आहे. या वर्षापासून आठवी आणि दहावीच्या बदललेल्या अभ्यासक्रमामध्ये पर्यावरणावर दोन स्वतंत्र धड्यांचा समावेश करण्यात आला असून, त्यातून पर्यावरण संतुलन राखण्यावर भर देण्यात आला आहे.

घराघरामध्ये पर्यावरण संतुलनाचे महत्त्व, माहिती घराघरात पोहोचावी, पर्यावरणाबाबत लोकांमध्ये जनजागृती व्हावी, यासाठी राज्य शासनाने इयत्ता आठवी आणि दहावीच्या पुस्तकात संतुलित पर्यावरणाचे महत्त्व विशद करणारे धडे समाविष्ट केले आहेत. राज्य शासनाच्या या निर्णयामुळे शाळेपासूनच विद्यार्थ्यांना संतुलित पर्यावरणाचे महत्त्व समजण्यास मदत होणार आहे.
आठवीच्या अभ्यासक्रमात ‘प्रदूषण’ आणि ‘इको सिस्टीम’ असे दोन धडे अंतर्भूत करण्यात आले आहेत. प्रदूषण या धड्यात प्रदूषण, त्याचे प्रकार, प्रदूषणाची निर्मिती, याबरोबरच वाढते प्रदूषण रोखण्यासाठी आवश्यक असलेल्या उपायांबाबत माहिती देण्यात आली आहे. याच धड्यात कचर्‍याचे ओला आणि सुका कचरा असे वर्गीकरण करणे कसे आवश्यक आहे, टाकाऊ, टिकाऊ आणि प्रदूषणकारक वस्तू यांचीही माहिती या धड्यात आहे. आज हवेमुळे मोठ्या प्रमाणात पर्यावरणीय असंतुलन होते, अशा वेळी हवा गुणवत्ता निर्देशांक, आम्लवर्षा, आणि प्रदूषण अधिनियम आणि कायदे यांची माहिती या धड्यात देण्यात आली आहे. तर दुसरा धडा हा पुर्णपूणे ‘इको सिस्टीम’ वर आधारित आहे. सध्याची स्थिती, वेगवेगळे प्रकार आणि वेळोवेळी करण्यात आलेले सर्वेक्षण, बदलेली स्थिती जसे वाढते औद्योगिकीकरण, नागरीकरण, शहरीकरण, वाढत गेलेले पर्यटन, लोकसंख्या वाढ, संसाधनाचा वाढलेला वापर, यामुळे इकोसिस्टीम कशी आहे याबाबत सर्व माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणविषयक जागृती होणार आहे. अभ्यासक्रमातील या बदलाचे शिक्षकांकडुन स्वागत केले जात आहे.