Breaking News

तालुक्याची मनसे कार्यकारिणी तडकाफडकी बरखास्त

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची अकोले तालुका कार्यकारिणी तडकाफडकी बरखास्त करण्यात आली असल्याची माहिती पक्षाचे तालुकाध्यक्ष दत्ता नवले यांनी लेखी पत्राद्वारे दिली.अकोले तालुका मनसेमध्ये काही महिन्यांपासून गटबाजीला उत आला आहे. अनेक तालुका पातळीवरील पदाधिकारी आपल्या पदाचा गैरवापर करून शासकीय अधिकारी व इतरांना जेरीस आणण्याचा प्रयत्न करत होते. तसेच याच आठवड्यात पक्ष प्रमुख राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त अकोले तालुक्यात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले. या कार्यक्रमापासून ते जाहिरातबाजीच्या पोस्टरपर्यंत तसेच मनसे तालुकाध्यक्ष दत्ता नवले यांना डावलण्यात आले होते. त्यामुळे पक्षातील गटबाजीला अधिकच पोषक वातावरण मिळाले. अकोले तालुका सचिव गणेश तोरमल यांनी आपल्या पद्धतीने तरुणांचे स्वतंत्र संघटन करण्यास सुरुवात केली. मात्र त्यांनी तालुकाध्यक्ष दत्ता नवले यांना विश्‍वासात न घेतल्यामुळे तालुकाध्यक्ष व सचिव यांच्यातच दुरावा निर्माण झाला. अखेर या गटबाजीला रोखण्यासाठी विद्यमान तालुकाध्यक्ष दत्ता नवले यांनी वरिष्ठांच्या आदेशाने अकोले तालुक्याची कार्यकारिणी बरखास्त केल्याने, अकोले तालुक्यात चर्चांना तोंड करून दिले आहे. बरखास्त केलेल्या कार्यकारिणीत गणेश तोरमल, पिंटू आमले, संजय गायकर, सुभाष मालूनजकर, दत्ता दळवी, योगेश कोंडार, योगेश बिन्नर, अनिल वाकचौरे, दत्ता कराळे, नवनाथ दराडे, दीपक देशमुख, बादशहा चौधरी, दत्ता भोर, संजय देशमुख, संजय खरात, हर्षल गुजर, शोएब तांबोळी आदी पदाधिकार्‍यांचा समावेश आहे. तालुकाध्यक्ष दत्ता नवले यांच्या या धडक कारवाईमुळे गणेश तोरमल यांचा गट शांत बसणार नसून ते नवले यांना नक्कीच कोपरखळीत पकडण्याचा प्रयत्न करतील. दरम्यान या निर्णयामुळे मनसे सैनिकांमध्ये कमालीची अस्वस्थता पसरली आहे.