आईसलँडने अर्जेन्टिनाला बरोबरीत रोखले
मॉस्को/वृत्तसंस्था :
अवघ्या 3 लाख 30 हजार लोकसंख्येच्या छोटयाशा आईसलँड संघाने दोनवेळचे विजेते अर्जेन्टिनाला 1-1 असे बरोबरीत रोखत फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत अगदी स्वप्नवत पदार्पण नेंदवले. लायोनेल मेस्सीने पेनल्टी दवडली, त्याचा अर्जेन्टिनाला या लढतीत चांगलाच फटका बसला. वास्तविक, या लढतीत सर्जिओ ऍग्युरोने 19 व्या मिनिटाला अर्जेन्टिनाचा पहिला गोल नोंदवला. पण, त्यांची ही आघाडी पाच मिनिटे देखील टिकू शकली नाही. आईसलँडच्या अल्पेड फिनबोगॅसनने सनसनाटी गोल करत आईसलँडला बरोबरीत आणले आणि अंतिमतः 1-1 अशीच कोंडी कायम राहिल्याने अर्जेन्टिनाची सपशेल निराशा झाली. आईसलँडसारख्या अगदीच दुबळया व यंदा कुठे पदार्पण करणाऱया संघाविरुद्ध अर्जेन्टिनाला विजय न मिळवता आल्याने त्यांच्या प्रबळ दावेदारीचे दावे किती पोकळ आहेत, याचीही आता फुटबॉल वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे. येथील स्पॅर्तक स्टेडियमवर महान खेळाडू दिएगो माराडोना आवर्जून हजर राहिले. पण, मेस्सीच्या खराब खेळामुळे सर्वांचीच निराशा झाली. मेस्सीला आतापर्यंत आंतरराष्ट्रीय स्तरावर एकही प्रतिष्ठेची स्पर्धा जिंकता आलेली नाही.
यापूर्वी, युरो 2016 स्पर्धेत इंग्लंडचे आव्हान संपुष्टात आणणाऱया आईसलँडसाठी अर्जेन्टिनाला बरोबरीत रोखणे, हे नैतिक विजय मिळवण्यासारखेच ठरले आहे. या गटात नायजेरिया व क्रोएशिया या दोन संघांचा समावेश असून बाद फेरीच्या शर्यतीत या निकालामुळे आणखी रस्सीखेच होऊ शकते, हे स्पष्ट झाले. 45 हजार प्रेक्षकक्षमतेच्या स्टेडियमवर आईसलँडने अर्जेन्टिनाला चांगलाच फेस आणला. वास्तविक, बॉल पझेशनच्या आघाडीवर अर्जेन्टिनाने 74 टक्के वर्चस्व गाजवले. पण, खराब फिनिशिंगमुळे व कल्पक खेळाच्या अभावामुळे त्यांना या लढतीत मुसंडी मारण्याची अगदी स्वप्नेही पाहता आली नाहीत. प्रारंभी, ऍग्युरोने 19 व्या मिनिटाला डाव्या पायाने चेंडू फटकावत गोलजाळयाचा यशस्वी वेध घेतला होता. अर्थात, त्यानंतर आईसलँडने केलेला प्रतिहल्ला अधिक संस्मरणीय ठरला. यावेळी फिनबोगॅसनने चारच मिनिटांमध्ये अर्जेन्टिनाचा गोलरक्षक विल्प्रेडो कॅबालेरोला सहज चकवा दिला.
मेस्सीचे अपयश धक्कादायक
वास्तविक, या लढतीतील दुसऱया सत्रात 1-1 बरोबरीची कोंडी फोडण्याची नामी संधी अर्जेन्टिनाकडे चालून आली होती. 63 व्या मिनिटाला रुरिकने मेझाला पाडले, ते हेरत पॉलिश रेफ्री मॅर्सिनियाकनी पेनल्टी कीक बहाल केली. मेस्सी पेनल्टीसाठी पुढे सरसावला. पण, आईसलँडचा गोलरक्षक हॅनेस हॉलडॉर्सनने अगदी बिनचूकपणे मेस्सीची पेनल्टी परतावून लावल्यानंतर अर्जेन्टिनाच्या गोटात अक्षरशः सन्नाटा पसरला. स्वतः मेस्सी देखील यामुळे बराच निराश दिसून आला.