गौरी लंकेशच्या खूनाची तुलना कुत्र्याच्या मृत्यूशी श्रीराम सेनेच्या अध्यक्षाच्या विधानामुळे खळबळ
बंगळुरू : श्रीराम सेनेचे अध्यक्ष प्रमोद मुतालिक यांनी पत्रकार गौरी लंकेश यांच्या मृत्यूची तुलना कुत्र्याच्या मृत्यूशी केल्यामुळे नवीन वादाल तोंड फुटले आहे. रविवारी येथे आयोजित एका सभेत मुतालिक यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केले. काँग्रेस सरकारच्या अपयशावर कोणीही प्रश्नचिन्ह उपस्थित केले नाही. किंबहुना पंतप्रधान गौरी लंके श प्रकरणाविषयी मौन का बाळगून आहेत, असा प्रश्न ते विचारतात. गौरी लंकेशच्या मृत्यूनंतर पंतप्रधानांनी प्रतिक्रिया द्यावी अशी अनेकांची इच्छा होती. कर्नाटकात एखाद्या कुत्र्याचा मृत्यू झाल्यास मोदी प्रतिक्रिया का देतील? असे मुतालिक यांनी सांगितले. काँग्रेस सरकारच्या काळात महाराष्ट्र व कर्नाटकात झालेल्या चार पत्रकारांच्या मृत्यूचा जाब कोणीही विचारला नाही, असे मुतालिक यांनी सांगितले. यावेळी बोलताना गौरी लंकेश हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी परशुराम वाघमारेचा श्रीराम सेनेशी संबंध नसल्याचे मुतालिक यांनी यावेळी पुन्हा एकदा स्पष्ट केले. यापूर्वी वाघमारेचा मुतालिक यांच्यासोबत असलेल्या फोटोमुळे वाद निर्माण झाला होता. श्रीराम सेनेचा परशुरामशी काहीही संबंध नाही. त्याने विशेष तपास पथकासमोर काय सांगितले ते मला माहीत नाही. असे अनेकजण आहेत जे माझ्यासोबत फोटो काढतात. फक्त फोटो काढल्याने कोणी सेनेचा कार्यकर्ता बनू शकत नाही, असेही मुतालिक यांनी सांगितले.
