Breaking News

घराची नुकसान भरपाई मिळण्याची मागणी


कर्जत / प्रतिनिधी:
पंचायत समितीतून मिळालेल्या अनुदानित विहीर बांधताना करण्यात आलेल्या ब्लास्टिंगमुळे40 फुटावर असलेल्या आपल्या घराला तडे जाऊन नुकसान झाले असून, याकडे कोणतेही अधिकारी लक्ष देत नसल्याची तक्रार परसराम पांडुळे यांनी करत तहसीलदार यांना निवेदन देत आंदोलनाचा इशारा दिला आहे. 
चिंचोली काळदात येथील परसराम पांडुळे यांच्या बांधकाम सुरू असलेल्या घराजवळ अवघ्या 40 फुटावर लगतचे शेतकरी विष्णू बाबा पांडुळे यांनी पंचायत समितीतून मिळालेल्या अनुदानित विहीर बांधण्यास सुरुवात केली. सदर विहीर खोदताना ब्लास्टिंगमुळे आपल्या घराला तडे जाऊ शकतात, हे परसराम पांडूळे यांनी लक्षात आणून दिले. त्यावेळी काम थांबविण्यात आले. मात्र पुन्हा दहा दिवसांनी काम करताना ब्लास्टिंगच्या हादर्‍याने आपल्या नवीन घराला मोठ्या प्रमाणात भेगा पडल्या, हे घर धोकादायक बनले असून, आपले 15 लाख रुपयांचे नुकसान झाले असल्याची तक्रार 10 जून रोजी दिली. मात्र त्याकडे पंचायत समितीच्या कोणत्याही अधिकार्‍याने गंभीर्याने पाहिले नाही. यामुळे या प्रकाराची संपूर्ण चौकशी करून पंचनामा करून मला नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी तहसीलदार यांचेकडे निवेदनाद्वारे केली आहे.