Breaking News

गावगाडा आणि सामाजिक परिवर्तन

कुळधरण / किरण जगताप 
ग्रामीण भागात पारंपरिक विचारसरणी जपत चालणारी समाजरचना म्हणजे गावगाडा. जुनाट रुढी, परंपरांचा अंगिकार करुन दुसर्‍यांना वेठबिगारीने राबविणे हा गावगाड्याचा गाभा आहे. परंपरेच्या नावाखाली शोषणाची व्यवस्था कायम सुरु रहावी ही ग्रामीण भागातील ठरावीक वर्गाची उपजत मनोधारणा असते. समाजात निर्माण केलेली जातीची उतरंड कायम राहण्याचा या वर्गाचा अट्टाहास असतो. जातीयतेचे विष पेरत आपले सामाजिक वर्चस्व टिकविण्यासाठी त्यांची धडपड सुरु असते. समाज शहाणा झाला तर आपल्याला किंमत देणार नाही, या अनाहुत भीतीने या वर्गाला पछाडलेले असते. त्यामुळे शोषित, पिडित, उपेक्षितांसाठी काही करुन त्यांना चांगले दिवस आणण्याचा विचार गावगाडा चालविणार्‍यांच्या डोक्यात कधीच शिरत नाही. गावगाड्यातील स्वतःचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी त्यांच्यातील न्यायाच्या भूमिकेने फारकत घेतलेली असते.
गाव कोणतेही असो, त्यांच्या इतिहासाचा अभ्यास केला तर, त्यात मालकशाही, परंपरावाद, बुरसटलेल्या विचारांचा पगडा, कट्टर जातीयवाद अशा विविध छटा पहावयास मिळतात. आजही कित्येक खेड्यात हेच विदारक चित्र पहावयास मिळते. परिवर्तनाचे विरुद्ध टोक म्हणजे गावगाडा. कधीच बदलायचे नाही, या मानसिकतेतील लोकांचा समुदाय गावगाड्याचा वाहक असतो. गावात संख्येने अधिक असलेला समाज हा गावगाड्याचा पुरस्कर्ता असतो. त्यामुळे अल्पसंख्याकांचे मूलभूत हक्क हिरावून घेण्यासाठी त्यांच्यातील गटात जणू स्पर्धाच लागलेली असते.
फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा जपत न्याय्य हक्कासाठी लढणार्‍या कार्यकर्त्यांना जाणूनबुजून अडचणीत आणण्याचे प्रयोग ग्रामीण भागात होताना दिसतात. राजकारणावरील आपली पकड कायम ठेवण्यासाठी विविध षडयंत्र रचुन सत्याचे प्रयोग हाणून पाडण्यासाठी पोसलेले पुढारी पुढे असतात.मिसरूड फुटायच्या उंबरठ्यावरील पोरं आणि आर्थिक दुर्बल असलेल्यांना वापरुन घेण्याचा कल गावगाड्यात नित्याचा झाला आहे. माउथ पब्लिसिटीची यंत्रणा विशेष रितीने तत्पर असते.
दूध डेअर्‍या, सेवा संस्था, मंदिरे, गावातील मोक्याची पारावरची जागा ही त्यांच्या वर्दळीचे व प्रचार प्रसाराचे केंद्र असते. वैचारिक विरोध करणार्‍याला बदनाम करण्यासाठी त्यांचे पित्तु अहोरात्र झटत असतात. व्यसनापायी कुटूंबातुन मुल्य संपलेले लोक यांचे मुळ भांडवल असते. या सार्‍यांच्या कचाट्यात परिवर्तनाची पावले पुढे टाकणारे कार्यकर्ते सापडतात. हा ग्रामीण संस्कृतीचा भाग राहिला आहे. मात्र या सर्व अडथळ्यांचा सामना करीत विचारांच्या बैठकीवर लोकसंघटन झालेले लोक गावगाड्यात परिवर्तनाचे प्रयोग करीत असल्याचे दिसते. अल्पसंख्याक व बहुजन समाजाला सोबत घेवुन झुंडशाही संपविण्याठी होत असलेल्या प्रयत्नात सातत्य राहिले तर गावात परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही.