Breaking News

भाजपने पुन्हा मिळवला कोकण पदवीधर मतदारसंघ


रत्नागिरी : विधान परिषदेचा पदवीधर मतदारसंघ पुन्हा एकदा भाजपने मिळविला आहे. या जागेवर वर्चस्व मिळवण्यासाठी शिवसेनेकडून प्रयत्न सुरू होते. राष्ट्रवादीला हॅट्ट्रिक साधण्याची संधी होती. मात्र भाजपने राष्ट्रवादीचाच उमेदवार फोडून आणि नियोजनबद्ध प्रचार करून राष्ट्रवादीच्या ताब्यातील ही जागा पुन्हा मिळवली आणि सेना-राष्ट्रवादीचे मनसुबे उधळले. सहा वर्षांपूर्वी ॲड. निरंजन डावखरे राष्ट्रवादीचे उमेदवार म्हणून निवडून गेल्यानंतर त्यांनी मतदारसंघाशी फारसा संपर्क ठेवला नाही. त्यामुळे त्यांच्याबद्दल मतदारांमध्ये नाराजी होती. तरीही राष्ट्रवादी काँग्रेसकडून पुन्हा त्यांची उमेदवारी निश्‍चित होती. मागील निवडणुकीत शिवसेनेचा छुपा पाठिंबा आणि सत्तेच्या बळावर ते निवडून आले होते. शिवसेनेने वसंत डावखरे यांच्या विरोधात रवींद्र फाटक यांना उमेदवारी देऊन त्यांना विधान परिषदेवर निवडून आणले. तसेच निरंजन डावखरे यांचा पराभव करण्यासाठी संजय मोरे यांची उमेदवारी जाहीर केली. यावेळी राष्ट्रवादी सत्तेत नाही. पदवीधर मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. या पार्श्वभूमीवर डावखरे यांनी राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये प्रवेश केला. डावखरेंच्या प्रवेशामुळे भाजपमधील अनेकजण नाराज झाले. त्यांची नाराजी निवडणुकीत दिसेल, असे वाटले होते. परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतून प्रचाराची सूत्रे हलवली. शिक्षण संस्था चालक, संघटनांचे पदाधिकारी यांच्या बैठका घेतल्या. कंपन्यांच्या अधिकार्‍यांशी संपर्क साधला. त्यांचे विश्‍वासू आ. प्रसाद लाड यांनी कोकणात प्रचाराची धुरा सांभाळली. महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचीही डावखरे यांना साथ मिळाली. पक्षाचे सरचिटणीस आणि या मतदारसंघातील इच्छुक उमेदवार डॉ. विनय नातू, जिल्हाध्यक्ष बाळ माने, अ‍ॅड. दीपक पटवर्धन डावखरे यांना घेऊन जिल्ह्यातील शाळा-महाविद्यालयांत प्रचारासाठी गेले. शिवसेनेची मते कमी करण्यासाठी ठाण्यात तब्बल अकरा डमी उमेदवार भाजपकडून उभे करण्यात आले. ते भाजपचेच आहेत हे शिवसेनेला शेवटपर्यंत समजले नाही. भाजपचा जाहीर मेळावा जिल्ह्यात कोठेही झाला नाही. सोशल मीडियावर भाजपचे कार्यकर्ते फारसे सक्रिय नव्हते. पूर्वी निवडणुकीत बूथवर बसण्यासाठी भाजपकडे फारसे कार्यकर्ते नसायचे. या निवडणुकीत मात्र कार्यकर्त्यांची संख्या वाढल्याचे पाहायला मिळाले. प्रत्येक मतदारांपर्यंत पोहोचून ते मतदान केंद्रापर्यंत त्यांना आणत होते. मतदारांच्या नोंदणीच्या वेळीही भाजपचे प्रयत्न चांगले होते. त्या साऱ्याचे चांगले फळ भाजपला मिळाले. दोन वेळा गमावलेला मतदारसंघ पक्षाने पुन्हा मिळविला. तो टिकविण्यासाठी मात्र निवडून आलेले ॲड. निरंजन डावखरे यांना प्रयत्न करावे लागतील. गेल्या वेळेप्रमाणे मतदारसंघाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. त्यांच्या उमेदवारीमुळे नाराज झालेल्या भाजपमधील कार्यकर्त्यांना साथीला घेऊन मतदारसंघाशी सतत संपर्क ठेवावा लागेल. तेवढे समजण्याएवढे ते सुज्ञ आहेत.