Breaking News

आरेवाडा येथील महिलांची दारू विक्रेत्यांवर धाड


गडचिरोली : आरेवाडा येथे देशी व विदेशी दारूची अवैध विक्री करणाऱ्या दारू विक्रेत्यांवर बचत गटातील व मुक्तिपथ गाव संघटनेतील महिलांनी धाड टाकली. या महिलांनी एकूण सहा विक्रेत्यांच्या घरी व शेतात तपास करून दारू हस्तगत केली. या धाडीदरम्यान काही किरकोळ विक्रेत्यांना सुगावा लागला आणि त्यांनी त्यांच्याजवळचा माल लपवून ठेवला, म्हणून बराचसा माल हाती लागला नाही. सहा दारू विक्रेते सापडले. पण यांच्याकडे दारू सापडली नाही. देशी, विदेशी दारू विकणाऱ्यांपैकी दोन विक्रेत्यांनी बचत गटाच्या महिलांना अपशब्द वापरत, आमचे कोणी काही करू शकत नाही, असे म्हणून धमकावले. स्थानिक पोलिसांची दारू बंद करण्याबाबतची उदासीनता पाहून आम्ही स्वतःच दारू विक्री बंद करण्यासाठी प्रयत्न करत आहोत, असे तेथील महिला म्हणाल्या. गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम तालुका म्हणून भामरागडची ओळख आहे. छत्तीसगढ सीमेलगतच हा असल्याने अवैध दारूची वाहतूक रात्री - अपरात्री व्हॅन मधून दारूची तस्करी होत असून त्यामुळे शहरामधील दारू विक्रीच्या प्रमाणात वाढ झाली आहे. ही तस्करी थांबावी यासाठी वाहनांची तपासणी केली जावी, अशी मागणीही या महिलांनी केली आहे.