Breaking News

गुढघाभर पाण्यात चालते शिधावाटप कार्यालातील कामकाज; अधिकारी हतबल


डोंबिवली : मुंबई शिधावाटप विभाग अंतर्गत डोंबिवली शहरातील पश्चिम विभागात शिधावाटप कार्यालय आहे. गेली दहा वर्षे या शिधावाटप कार्यालायची परिस्थिती अतिशय वाईट आहे. इमातर धोकादायक परिस्थितीत असून पावसाळ्यात कार्यालयात गुढघाभर पाणी साचलेले असते. भागशाळा मैदान परिसर सखलभाग असल्याने पावसाळ्यात नेहमी पाणी भरते. गेली दहा वर्षे पाण्याखाली जाण्याऱ्या या कार्याल्याकडे संबंधित अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याने तेथील अधिकारी व कर्मचारी हवालदिल झाले आहेत. पश्चिम डोंबिवलीत भागशाळा मैदानशेजारी “बळवंत स्मृती’ नावाची इमारत सन – १९६९ रोजी बांधण्यात आली आहे. या इमारतीत तळमजल्यावर असलेल्या जागेत शिधावाट कार्यालय थाटण्यात आले आहे. सदर इमारतीचा पाया रस्त्यापासून सुमारे दोन फुट खोल असल्याने पावसाळ्यात येथे “पाणीचपाणी चोहीकडे” अशी परिस्थिती असते. इमारत गळत असल्याने परिणामी कार्यालयातही गुढघाभर जमा होते आणि ही परिस्थिती वर्षानुवर्षे तशीच आहे. गेले दोन दिवस शहरात पावसाची संततधार असून याचा त्रास येथील अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांना सहन करावा लागत आहे. या कार्यालय अंतर्गत सुमारे ४७ शिधावाटप दुकानदारांचे कामकाज होत असते. कार्यालयातून शिधावाटपपत्रिकेतील नांवे कमी करणे तसेच वाढविणे, पत्यातील बदल या पद्धतीची कामे होत असतात. या कामासाठी सुमारे 15 कर्मचारी कार्यरत आहेत. तसेच शिधावाटप दुकानदारांचा मासिक धान्यांचा कोठा याबाबतही कामकाज होत असते. दुकानदारांकडून धान्यांची किती विक्री झाली व किती कोटा मिळाला याचेही नियोजन याच कार्यालयातून होत असते. यामुळे या कार्यालयात नेहनीच मोठ्या प्रमाणात नागरिकांची वरदळ असते. अशा या कामांसाही चार निरीक्षक अधिकारी असून ते ही याच कार्यालयात काम करीत आहेत. एक निरीक्षक अधिकारी सुमारे 10 दुकानदारांचे कामकाज पाहत असल्याने तुंबलेल्या पाण्यात काम करणे कठीण होत आहे. कामकाज संगणकाच्या माध्यमातून होत असल्याने पाण्यामुळे शॉर्टसर्किट होण्याची दाट शक्यता असल्याचे येथील कर्मचारी सांगत आहेत. गुरूवारी पावसाच्या संततधारेमुळे पाणी तुंबले होते. याची दाखल घेऊन स्थानिक नगरसेविका विद्या राजेश म्हात्रे यांनी पालिका अधिकारी तसेच आपत्कालीन कामगारांमार्फत पाण्याच निचरा केला परंतु याचा काहीच फायदा झाला नसून आजही संबंधित कार्यालायात पाणी तुंबून राहत असल्याने तेथील सर्वच कर्मचाऱ्यांची स्थिती दयनीय झाली आहे. याबाबत शिधावाटप जिल्हा वरिष्ठ अधिकारी वंजारी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रशिक्षण वर्गात असल्याने बोलू शकत नाही असे सांगितले. अशा या परिस्थितीमुळे त्या कार्यालयातील कर्मचारी तसेच नागरिकांचे प्रश्न अनुत्तरीच राहणार आहेत.