Breaking News

गौताळा अभयारण्य झाले प्लास्टिकमुक्त वनाधिकारी नागपूरकर यांचा स्तुत्य उपक्रम


औरंगाबाद - राज्यात प्लास्टिक बंदी लागू झाल्यानंतर सगळीकडे प्लास्टिक जप्ती आणि दंडात्मक मोहीम सुरू झाली आहे. या पार्श्‍वभूमीवर औरंगाबाद जिल्ह्यातल्या गौताळा अभयारण्यात प्लास्टिकमुक्तीचा सुखद प्रयोग पाहायला मिळाला आहे.गौताळा अभयारण्याचे वनाधिकारी रत्नाकर नागपूरकर यांनी आपल्या कर्मचार्‍यांसह अभयारण्यात पडलेल्या प्लास्टिकच्या आणि काचेच्या तब्बल 15 हजार बाटल्या जमा केल्या आहेत. या उपक्रमातून अभयारण्य पूर्णपणे प्लास्टिकमुक्त झाले आहे. औरंगाबाद जिल्ह्यातल्या कन्नड तालुक्यात तब्बल 240 चौरस किलोमीटर अंतर परिसरात गौताळा अभयारण्य पसरलेले आहे. या अभयारण्यात विविध वन्यप्राण्यांसह आकर्षक पर्यटन स्थळांमुळे वर्षभर या परिसरात पर्यटकांची रेलचेल सुरू असते. येणारे पर्यटक मात्र प्लास्टिक बॅग, पाण्याच्या बाटल्या वापरून झाल्यानंतर जंगलातच टाकून निघून जातात. त्यामुळे अभयारण्यात सगळीकडे प्लास्टिक कचरा निर्माण झाला होता. प्लास्टिक बंदीमुळे हा कचरा कमी होईल, पण जो कचरा झालेला होता त्यामुळे जंगल प्रदूषितच राहिले असते. त्यामुळे रत्नाकर यांच्यासह कर्मचार्‍यांनी जंगलातील डोंगर्‍याच्या दर्‍यात, कपारीत आणि खोलगट भागत पडलेला कचराही मोठ्या शिताफीने उचलला आहे. त्यामुळे गौताळा अभयारण्य आता खर्‍या अर्थाने प्लास्टिक मुक्त झाले आहे. वनकर्मचार्‍यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. यातून निव्वळ प्लास्टिक बंदी करून भागणार नाही तर प्लास्टिक मुक्तीसाठीही प्रयत्न केले गेले पाहिजेत असा संदेश यातून देण्यात आला आहे.