Breaking News

‘त्या’ अत्याचारग्रस्त महाविद्यालयीन विद्यार्थिनींवर दबाव! प्रकरण दडपविण्यासाठी लाखोंची ‘ऑफर’ ‘ते’ दुकानदार पोलिसांच्या रडारवर

अहमदनगर / प्रतिनिधी

नेवासे तालुक्यातील सोनई पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरत आहे. या गावाजवळील खेडले परमानंद येथील दलित समाजातील महाविद्यालयीन विद्यार्थिनींवर सोनईच्या दोन तरुणांनी लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार केले. सोनई-राहुरी रस्त्यालगतच्या एका लॉजमध्ये हा प्रकार घडला. या प्रकाराची ‘किर्ती’ पोलिसांना समजल्यानंतर यातील एका मुलाला पोलिसांनी ‘हिसका’ दाखविला. दरम्यान, हे प्रकरण मिटविण्यासाठी सदर दोन महाविद्यालयीन विद्यार्थिनींवर दबाव टाकण्यात येत आहे. यासाठी काही स्थानिक कार्यकर्ते या मुलींना लाखोंची ‘ऑफर’ देत आहेत. सोनईच्या स्वामी विवेकानंद चौकातील ते दोन दुकानदार मात्र पोलिसांच्या रडारवर आहेत. 

खेडले परमानंद येथील दलित समाजातील दोन मुली दररोज सोनईच्या एका महाविद्यालयात शिकायला येतात. या दरम्यान, त्यांची स्वामी विवेकानंद चौकातील दोन दुकानदारांसमवेत ओळख झाली. या ओळखीचे रूपांतर मैत्रीत आणि शेवटी प्रेमात झाले. या अविवाहित दुकानदारांनी या मुलींना लग्नाचे आमिष दाखविले. सोनई-राहुरी रस्त्यालगत या ‘कामक्रीडा’साठी परिचित असलेल्या एक लॉजमध्ये या मुलींना बोलविण्यात आले. त्या लॉजमध्ये या दोन दुकानदारांनी महाविद्यालयीन मुलींवर अत्याचार केले. 

या प्रकाराची माहिती सदर मुलींच्या नातेवाईकांना समजल्यानंतर संतप्त नातेवाईकांनी पोलीस ठाण्यात जाऊन घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला. त्यानुसार यातील एका दुकानदाराला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेत ‘आत’ टाकले. त्याला सोडविण्यासाठी आणि हे प्रकरण मिटविण्यासाठी सदर मुलींना लाखोंची ‘ऑफर’ दिली आहे.

येथेही ‘महाराज’च आघाडीवर

सोनईत घडलेल्या प्रत्येक ‘प्रकरणा’त तडजोड करण्यासाठी श्रीरामवाडी येथील महाराज नेहमी अग्रेसर असतो. या दोन मुलींना ‘ऑफर’ देण्यासाठी तडजोडी करण्याची जबाबदारीदेखील या महाराजाने इमानेइतबारे पार पाडली. मात्र त्या मुलींनी ही ‘ऑफर’ धुडकावत या दोन दुकानदारांविरुद्ध गुन्हा दाखल झालाच पाहिजे, यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे पाठपुरावा सुरु केला आहे. मात्र ‘प्रकरण’ वाढू नये, यासाठी ‘महाराजा’करवी पोलिसांनाही ‘बिदागी’ देण्याचा प्रयत्न झाला.