वीज पडून महिला गंभीर जखमी
।संगमनेर/प्रतिनिधी।
शहरासह तालुक्यातील अनेक भागांत काल {दि. १९} झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लावली. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असला तरी तालुक्याच्या पठार भागात जोरदार वादळी वारा व विजांच्या कडकडाटात पावसाचे आगमन झाले. यात नांदूर खंदरमाळच्या बावपठार येथील मनिषा प्रकाश भागवत (वय ३३) ही महिला विज पडल्याने भाजून गंभीर जखमी झाली. त्याचप्रमाणे खैरदरा भागात वीज कोसळून एक बैल ठार झाला.
बाव पठार येथील मनिषा भागवत ही महिला राहत्या घराजवळच्या शेतात कुटूंबियांसमवेत मका काढण्यासाठी गेली होती. सायंकाळी सातच्या सुमारास पावसाची सुरवात झाली. डोक्यावर चाऱ्याची पेंडी घेऊन जात असताना सदर महिलेच्या अंगाला वीज स्पर्श करुन गेली. यामुळे ती भाजल्याने गंभीर जखमी होऊन कोसळली. त्यांनतर तिला तातडीने उपचारासाठी संगमनेरच्या खासगी रुग्णालयात दाखल केले. तिची प्रकृती चिंताजनक असल्याने डॉक्टरांनी ७२ तास निगराणीखाली ठेवले आहे.
दुसऱ्या एका घटनेत याचवेळी खैरदरा परिसरातील बारकू नामदेव दुधवडे हे जंगलात चरण्यासाठी बांधलेला बैल पावसात सोडून घराकडे परतत असताना, वीज कोसळून बैलाचा मृत्यू झाला. यात दुधवडे सुदैवाने बचावले.
