Breaking News

हागणदारीमुक्त शहर या अभियानाचा उडाला फज्जा!


राहुरी तालुका प्रतिनिधी
राहुरी नगरपरिषदेच्या हद्दीत स्वच्छता अभियानाचा फुसका बार उडाला आहे. शहराच्या काही प्रभागांमध्ये अद्यापही हागणदारीचे साम्राज्य आहे. नगराध्यक्षांसह प्रभागाचे नगरसेवक रहिवाशांचे प्रबोधन करण्यात ‘फेल’ ठरत आहेत. उघड्यावर शौचास जाणाऱ्या नागरिकांवर कारवाईचा बडगा उगारला जात नसल्याने नागरिकही मुक्त हागणदारीवर राजरोस उघड्यावर शौचास जात आहेत. त्यामुळे नगर पालिका हद्दीत हागणदारीमुक्त शहर या अभियानाचा फज्जा उडाला आहे. 

राहुरी शहराच्या काही परिसरात उघड्यावर शौचास बसणा-यांचे प्रमाण मोठे आहे. येथील परिसरात दुर्गंधी पसरत असून यामुळे रोगराईला निमंत्रण मिळत आहेत. नागरिकांचे आरोग्य या मुक्तहागणदारीमुळे धोक्यात आले आहे . या बाबत आरोग्य विभागदेखील झोपेत आहे. आमचा परिसर स्वच्छ तर गाव स्वच्छ, अशी हाकाटी रोज कचरा वेचणा-या घंटागाडीच्या माध्यमातून देण्यात येते. मात्र याचा परिणाम होत नसल्याने प्रबोधनाचा बट्ट्याबोळ आहे. 


राहुरी नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक वेळी नगराध्यक्ष म्हणून जनतेला सामोरे जाताना शहरातील पाणी, आरोग्य, वीज आदी नागरी समस्यांसाठी भ्रमणध्वनी सदैव सर्वांसाठी अहोरात्र सुरु राहिल, असे सांगत विद्यमान नगराध्यक्षांनी त्यांचा भ्रमणध्वनी {मोबाईल} नागरिकांसाठी प्रसारमाध्यमाच्या माध्यमातून जारी केला होता. मात्र अनेकदा नगराध्यक्षांच्या भ्रमणध्वनीवर संपर्क केला असता तो उचललाच जात नाही. कधी तो बंद तरी असतो किंवा संपर्क क्षेत्राच्या बाहेर तरी असतो. त्यामुळे भ्रमणध्वनीवरुन नगराध्यक्षांचा संपर्क होत नसल्याचे अनेकदा समोर आले आहे. परिणामी नागरिकांना गा-हाणे मांडताच येत नाही. ‘नगराध्यक्ष आपल्या दारी’ याचाही नगरपालिकेला विसर पडल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.