Breaking News

नाईकवाडी यांचे शैक्षणिक कार्य कर्मवीरांसारखे : बुर्के


अकोले / प्रतिनिधी । 29 ः
शिक्षणक्षेत्रात स्वतंत्र सेनानी बा.ह. नाईकवाडी यांचे शैक्षणिक कार्य हे कर्मवीर भाऊराव पाटील यांचेसारखे असल्याचे गौरवोद्गार ज्येेष्ठ साहित्यिक श्याम बुर्के यांनी काढले. अगस्ति एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक गुरुवर्य बा.ह. नाईकवाडी यांच्या जयंती सोहळ्यानिमित्त प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी योगी केशव बाबा चौधरी होते तर, यावेळी संस्थेच्या सचिव दुर्गा नाईकवाडी कार्यवाहक शिरीष नाईकवाडी, सतीश नाईकवाडी, संदीप नाईकवाडी उपस्थित होते.
प्रा. बुर्के यांनी मार्गदर्शन करताना पुढे सांगितले की, मातृभाषेत शिक्षण घेतल्यास मेंदू विकसित होतो. जगातील कोणतीही भाषा आपण अगदी सोप्या पद्धतीने शिकू शकतो. संगणक आज जगाची भाषा असून, ती आत्मसात न केल्यास आपण संगणक शिक्षणामध्ये निरक्षर राहू शकतो. असा धोका बुर्के यांनी व्यक्त केला. आत्मविश्‍वास न गमविता, दुसर्‍यासाठी झिजा, द्वेष करू नका तर, गुरूला श्रेष्ठस्थान द्या असा संदेशही प्रा. श्याम बुर्के यांनी दिला. 
बा. ह. नाईकवाडी यांचे आचार, विचार समाजासाठी प्रेरणादायी आहेत. सामाजिक बांधिलकी जपत बहुजन, कष्टकरी, समाजातील मुला, मुलींना शिक्षणाची कवाडे उघडी करून देत, त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी केलेले कार्य महान असल्याचे योगी केशवबाबा चौधरी यांनी सांगितले. आयुष्यभर बाबांनी घालून दिलेल्या आदर्शवादी मार्गानेच अगस्तीचा हा जगन्नाथांचा रथ सर्वांना बरोबर घेवून पुढे अविरत चालत राहील अशी ग्वाही संस्थेचे कार्यवाहक सतीश नाईकवाडी यांनी प्रास्ताविकेत दिली.
स्वागत उपमुख्याध्यापक जी.पी. अभंग यांनी तर, आभार मुख्याध्यापक सिताराम पथवे यांनी मानले. सूत्रसंचालन सतिष पाचपुते यांनी केले.