अवैध उत्खनन करणार्यांवर कडक कारवाई, तहसीलदार कांबळे याचे प्रतिपादन
महसूल विभागाची परवानगी न घेता विनापरवाना अवैध उत्खनन करणार्यांवर कडक कारवाई करणार असल्याचा इशारा अकोले तालुक्याचे तहसीलदार मुकेश कांबळे यांनी दिला.
तहसीलदार कांबळे यांनी अकोले टाईम्स कार्यालयास सदिच्छा भेट दिली. यावेळी महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने तहसीलदार कांबळे यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघाचे जिल्हा कमिटी सदस्य निरंजन देशमुख, तालुकाध्यक्ष गणेश आवारी, सचिव अमोल शिर्के, उपाध्यक्ष युवराज हंगेकर, सचिन लगड, संजय ठिकेकर, शशिकांत सरोदे, शंकर संगारे, किशोर कोकाटे, निलेश सहाणे, गणेश मंडलिक आदी उपस्थित होते. यावेळी महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघाच्या सदस्यांनी तहसीलदार कांबळे यांच्याशी मुक्त संवाद साधला.
तहसीलदार कांबळे पुढे म्हणाले की, अकोले तालुका शांतताप्रिय व निसर्ग सौंदर्याने नटलेला अद्भूत तालुका आहे. त्यामुळे या भागात प्रशासकीय अधिकारी म्हणून काम करताना मला मनस्वी आनंद होत आहे. कोणत्याही राजकीय पक्षाचे पदाधिकारी एखाद्या कामासाठी दबावतंत्राचा वापर करीत नाही, त्यामुळे कामात नितळपणा व पारदर्शीपणा येत असल्याचे तहसीलदार कांबळे म्हणाले. डाव्या चळवळीचा तालुका असलेल्या या तालुक्यात आंदोलने मोर्चेदेखील शांततेत होतात, याचा आम्हाला अभिमान वाटतो. इतर तालुक्यांपेक्षा अकोले तालुक्यात गौण खनिजांची चोरटी वाहतूक कमी प्रमाणात होते. मुळा, आढला विभागात शेतातून वाळू काढण्याचे प्रमाण जास्त आहे. परंतु प्रवरेसारख्या नदीत घुसून कुणी वाळू चोरी करण्याचा प्रयत्न कुणीही करीत नसल्याचे प्रतिपादन ही तहसीलदार कांबळे यांनी केले. विनापरवाना जर कुणी अवैध उत्खनन करून त्याची वाहतूक करताना आढळल्यास त्यावर महसुली नियमाप्रमाणे कडक कारवाई करण्यात येईल, असा इशाराही तहसीलदार कांबळे यांनी दिला.