Breaking News

लालपरीचे’ तिकीट महागले


मुंबई : लालपरी म्हणून ओळखली जाणारी, सर्वसामान्यांचे प्रवासाचे हक्काचे वाहन अशी ओळख असलेल्या एसटीचा प्रवास शुक्रवारी मध्यरात्रीपासून महागणार आहे. इंधन दरवाढ, सुट्या भागांचा वाढीव खर्च, कर्मचारी वेतनवाढ या कारणांमुळे एसटी महामंडळावर जास्तीचा भार पडत असून,हा भार कमी करण्यासाठी महामंडळाने आजपासून तिकीट दरामध्ये 18 टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला. गेल्या काही महिन्यात डिझेलच्या किमती सातत्याने वाढत आहे. त्यातच एसटी महामंडळावर दरवर्षी सुमारे 460 कोटी रुपयांचा भार पडण्याची शक्यता आहे. अशातच महामंडळाने कर्मचार्‍यांची थकीत वेतनवाढ केली असून त्यातून महामंडळावर प्रत्येक वर्षी जवळपास 1,200 कोटी रुपयांचा अतिरिक्त भार पडणार आहे. या सर्व खर्चामुळे महामंडळाचा तोटा आणखीनच वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे यातून मार्ग काढण्यासाठी महामंडळाने 18 टक्के भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे वर्षाला सुमारे एक ते दीड हजार कोटी रुपयांपर्यंत महसूल जमा होईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. 

असे असतील नवे दर? नवीन तिकीटदरांमुळे मुंबई ते पुण्यापर्यंत शिवशाहीचे तिकीट 253 रुपयांवरून 300 रु तर मुंबई ते नाशिक साध्या बसचे तिकीट 182 वरून 215 रु. तर मुंबई ते क ोल्हापूरचे तिकीट 417 रुपयांवरून 490 रुपयांवर जाण्याचा अंदाज आहे.