Breaking News

अनुसूचित जातीच्या तरुणांमधील अस्वस्थतेचा स्फोट होईल : संभाजी भगत

मुंबई - एल्गार परिषद घेणार्‍यांवर गुन्हे दाखल केल्यामुळे राज्यातील अनुसूचित जातीच्या तरुणांमध्ये प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली आहे. सध्या सरकार तरुणांना ज्या पद्धतीने गुन्हे दाखल करून तुरुंगात टाकत आहे, हे थांबायला हवे. हे लवकर थांबले नसल्यास कोणत्याही क्षणी तरुणांच्या अस्वस्थतेचा स्फोट होईल, अशी भीती शाहीर संभाजी भगत यांनी व्यक्त केली आहे. एल्गार परिषदेतील लोकांनी स्वतःचा इतिहास शोधण्याचा प्रयत्न केला. त्यांनी आपला इतिहास शोधला आणि त्यांची मांडणी सुरू केल्यामुळे एल्गार परिषदेच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल क रण्यात आले असल्याचा आरोप भगत यांनी केला आहे. भिडे आणि एकबोटे यांना वाचविण्यासाठी सरकार एल्गार परिषदेच्या लोकांना त्रास देत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. या देशात सांस्कृतिक राजकारणाचेच मुख्य राजकारण केले जाते. ज्या ज्या वेळी राज्यातील इतर समाजातील लोक सांस्कृतिकदृष्ट्या सक्षम होण्याचा प्रयत्न करतील, त्या प्रत्येकवेळी समाजातील दुर्लक्षित लोकांना अशाच पद्धतीने अटक करून भीती दाखविण्यात येईल. सांस्कृतिक विषयात आपल्यापेक्षा कोणीच वरचढ होऊ नये, यामुळेच एल्गार परिषदेच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करून त्यांना अटक करण्यात आली असल्याचा आरोप शाहीर संभाजी भगत यांनी केला आहे.

अनुसूचित जातींच्या लोकांना नक्षलवादी म्हणणे हे आता नवीन राहिलेले नाही. अनुसूचित जातीतील कोणी काही चांगले करत असतील, तर त्यांना नक्षलवादी ठरवून तुरुंगात टाक ण्याचे काम सध्या सुरू आहे. ज्यांना अटक झाली आहे, त्यांच्यासोबत माझे वैचारीक मतभेद असू शकतील, मात्र त्यांनी जे सांस्कृतिक कार्यक्रम घेऊन सांस्कृतिक वाटचाल सुरू केलेली आहे, ती राज्याच्या दृष्टीने आणि लोकशाहीच्या दृष्टीने खूप महत्त्वाची आहे. त्यामुळे सरकारने या सर्व गोष्टींचा विचार करूनच निर्णय घ्यावा, असे आवाहन भगत यांनी केले आहे.