Breaking News

शिवसेनेशिवाय विजय मिळवणे अवघड मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली चिंता

मुंबई - राज्यातील लोकसभेच्या पोटनिवडणुकीत शिवसेनेने भाजपला चांगलाच घाम फोडला होता. आगामी निवडणुकीत शिवसेनेला सोबत घेतल्याशिवाय भाजपला यश मिळवणे कठीण असल्याची चिंता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पदाधिकार्‍यांच्या बैठकीत व्यक्त केली. शिवसेनेला सोबत घेण्याचा प्रयत्न करा, असे मुख्यमंत्र्यांनी पदाधिकार्‍यांना सां गितल्याची चर्चा आहे. दादरच्या वसंत स्मृती या भाजपच्या कार्यलयात पदाधिकार्‍यांची बैठक झाली होती. या बैठकीत आगामी निवडणूक आणि शिवसेना हाच मुख्य मुद्दा असल्याची माहितीही सूत्रांनी दिली. पदाधिकार्‍यांच्या बैठकीत विधान परिषदेच्या चार जागांसाठी होऊ घातलेल्या निवडणुकीबाबत ही चर्चा करण्यात आली आहे. 


पालघरच्या पोट निवडणुकीत शिवसेनेच्या विरोधात लढवूनही भाजपने विजय मिळवला आहे. पण, हा विजय मिळवण्यासाठी भाजपला प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागली. त्यामुळे आगामी निवडणुका जिंकण्यासाठी शिवसेनेची सोबत ही जमेची बाजू असेल, असे मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत पदाधिकार्‍यांना सांगितले. या बैठकीबाबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे म्हणाले, की कार्यकर्त्यांशी संवाद साधून पदाधिकारी पक्षाची स्थिती वरिष्ठ नेत्यांच्या समोर मांडतात. आजच्या पदाधिकारी बैठकीतही या संदर्भातील आढावा घेण्यात आला असून, मुख्यमंत्र्यांनी आगामी निवडणूक डोळ्यासमोर ठेवून तयारी सुरू करण्याचे निर्देश दिले असल्याचे त्यांनी सांगितले. 
शिवसेनेला सोबत घेण्याबाबत चर्चा झाली का ? अशी विचारणा करताच दानवे म्हणाले की, शिवसेना आताही आमच्यासोबत सत्तेत आहे. एक पोटनिवडणूक शिवसेनेने भाजपविरोधात लढवली आहे. पण, आमच्या पक्षश्रेष्ठींनी सेना सोबत असल्याचा उल्लेख वारंवार केला आहे. यापुढेही चर्चेचा मार्ग थांबला नसल्याचे त्यांनी सांगितले. राज्यात शेतक र्‍यांच्या संपाचा 7वा दिवस असून, पुढे स्थिती आणखी बिकट होत जाणार असल्याची चिंताही काही पदाधिकार्‍यांनी या बैठकीत व्यक्त केली. शेतमालाला योग्य दर मिळवून देण्यासाठी आणखी काही ठोस पावले उचलली गेली पाहिजेत. तसेच वाढत्या इंधनाच्या किमतीमुळे जनतेत नाराजी असल्याचा सूरही या बैठकीत पदाधिकार्‍यांनी आळवला असल्याची माहिती मिळत आहे. मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्षांनी पदाधिकार्‍यांचे म्हणणे एकूण घेतले असून, यापुढे स्थानिक पातळीवरही सेनेला सोबत घेण्याचा प्रयत्न केला जाईल, असे पदाधिकार्‍यांनी यावेळी सांगितले.